MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:33 IST2025-12-15T15:33:00+5:302025-12-15T15:33:56+5:30
MNS Vandalizes Election Commissions Office In Kalwa: मनपा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कळवा येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केल्याची बातमी समोर आली.

MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
थोड्याच वेळात मनपा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कळवा येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मतदार यादीतील घोळांमुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी हे आक्रमक पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसे कार्यकर्ते सकाळी ११ वाजल्यापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते आणि तिथे त्यांनी आंदोलन सुरू केले. मतदार यादीतील त्रुटींवर कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. दरम्यान, मतदार यादीत अनेक मतदारांची नावे दुबार आलेली आहेत, तसेच जे मतदार हयात नाहीत, त्यांची नावेही यादीत आहेत, जिथे सपाट जमिनी आहेत, तिथे इमारती दाखवून मतदारांची नावे नोंदवण्यात आली आहेत, अशा अनेक तक्रारी घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धडक दिली.
मनसे कार्यकर्त्यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्यांना अधिकाऱ्यांकडून कोणतेही योग्य उत्तर मिळाले नाही. अधिकाऱ्यांनी 'तुमचे प्रश्न सोडवले जात आहेत,' असे दाखवण्याचा प्रयत्न करत असतानाच, निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइट चालत नव्हती. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी कार्यालयात तोडफोड करायला सुरुवात केली. मनपा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवर आणि कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.