आमदार प्रकाश आवाडे भाजपचे कमळ हातात घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 14:01 IST2020-12-07T13:52:09+5:302020-12-07T14:01:55+5:30
Politics, Devendra Fadnavis, Bjp, PrakashAwade, Kolhapur माजी मंत्री व इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या घडामोडी आहेत. त्यांना पक्षाने जिल्हाध्यक्षपद ऑफर केले आहे.

आमदार प्रकाश आवाडे भाजपचे कमळ हातात घेणार
विश्र्वास पाटील
कोल्हापूर : माजी मंत्री व इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या घडामोडी आहेत. त्यांना पक्षाने जिल्हाध्यक्षपद ऑफर केले आहे.
त्यांनी भाजपमध्ये न जाता काँग्रेसमध्ये यावे यासाठी त्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच.के.पाटील हे आज सोमवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी आवाडे यांची भेट घेणार आहेत. एका लग्नाच्यानिमित्ताने एच.के.पाटील इचलकरंजीत आले आहेत.
आवाडे व खासदार गिरिश बापट यांचे दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात पुण्यात प्राथमिक बैठक झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आवाडे यांची चर्चा झाल्याचे सुत्रांकडून समजले. पुढील आठवड्यात फडणवीस व पक्षाचे सर्वेसर्वा अमित शहा यांच्यासोबत आवाडे यांची भेट होणार असल्याचे सांगण्यात येते.
आज सोमवारी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्या मुलग्याचा विवाह सोहळा आहे. राजेश पाटील हे काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे या लग्न सोहळ्यास ते उपस्थित राहिले आहेत. त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन आवाडे यांच्या निवासस्थानी करण्यात आले आहे.
- गत निवडणूकीत इचलकरंजी मतदार संघातून भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांचा एकतर्फी पराभव करून आवाडे विजयी झाले आहेत. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. सध्या ते आमदार असले तरी जिल्ह्याच्या राजकारणाच्या मुख्य धारेपासून थोडेसे बाजूला पडले आहेत.
- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असले तरी ते विधानसभेला कोथरूड मतदार संघातून विजयी झाल्याने कोल्हापूरच्या राजकीय घडामोडीकडे लक्ष द्यायला त्यांना मर्यादा येत आहेत.
- सध्या महाडिक गट भाजपमध्ये सक्रीय आहे परंतू कोल्हापूरची जनता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही.
- सध्याचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे चांगले काम करत असले तरी कागल विधानसभा हे त्यांचे मुख्य टार्गेट आहे. आता कोल्हापूरात महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. तेथील पक्षापुढील आव्हान मोठे आहे.