कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:23 IST2025-10-31T15:19:01+5:302025-10-31T15:23:42+5:30
एकनाथ शिंदेंच्या कामाची तुम्ही अनेकदा दखल घेतली आहे. आम्ही कधी तुमच्यावर टीका केली नाही. आज तुमची एवढी भूमिका बदलली कशी असा सवाल मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.

कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
मुंबई - राज ठाकरे यांनी ज्याप्रकारे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली ते पाहता कन्फ्यूज नेत्यांमध्ये आणखी एक नेत्याची भर पडली आहे. काल काय बोललो, आज काय बोलायचे त्यात ते गोंधळलेले आहेत. लाव रे तो व्हिडिओ असा प्रयोग केला, तर त्यांची उबाठा नेत्यांविषयी वक्तव्ये काय हे त्यातून दिसेल. शिवसेनाप्रमुखांच्या आजूबाजूला जे बडवे बसलेत त्यांनी बाळासाहेबांना घेरले म्हणून शिवसेना सोडली असं राज ठाकरे यांनी म्हटले. आज तुम्ही त्या बडव्यांकडे जातायेत. तुम्ही एकदा काय दहा वेळा गेले तरी आम्हाला काही देणे घेणे नाही. दोन बंधू एकत्र आले त्याचा आनंद आम्ही त्यावर टीका करत नाही. परंतु १८-१९ वर्ष तुम्ही जो संघर्ष केला, तुमच्यासोबत असलेल्या मनसैनिकांनी संघर्ष केला त्याचे काय? असा सवाल मंत्री संजय शिरसाट यांनी विचारत राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, आम्ही जेव्हा धाडसी पाऊल उचलले तेव्हा तुम्ही कौतुक केले होते. आता आम्ही चाटू वाटायला लागलो. मागच्या लोकसभेला तुम्ही मोदींचे गुणगान गात होता. आता ते दुश्मन वाटायला लागले. मनसैनिकांची अवस्था काय, कोणता झेंडा घेऊ हाती, उबाठाचा, शरद पवारांचा, काँग्रेसचा...तुमचा झेंडा कधी कुणाच्या हातात जाईल माहिती नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे टाळा. जे तुम्हाला जमले नाही ते आम्ही हिंमतीने केले. एकनाथ शिंदेंच्या कामाची तुम्ही अनेकदा दखल घेतली आहे. आम्ही कधी तुमच्यावर टीका केली नाही. आज तुमची एवढी भूमिका बदलली कशी, मनसैनिकांनी शरद पवार, राहुल गांधींच्या घोषणा देणार का? असा टोला त्यांनी मनसेला लगावला.
तसेच आता मनसेने थांबले पाहिजे, त्यांनी उबाठात सामील झालं पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचं काम अनेकजण करतात त्यात आणखी एक भर पडली आम्हाला फरक पडत नाही. शिंदे यांनी जी हिंमत दाखवली ती महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यांच्या ताकदीचा आम्हाला गर्व नाही तर अभिमान आहे असंही शिरसाट यांनी म्हटलं.
दरम्यान, एका माणसाने शिवसेना इतरांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांचे विचार बाजूला सारले. त्याला जपण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे. तुमची भूमिका काय याचे आम्हाला देणे घेणे नाही. निवडणूक आयोगावरील भूमिकेवर आमचा आक्षेप नाही. दुबार मतदार असेल काढलेच पाहिजे. मतदार याद्या स्वच्छ असल्या पाहिजे ही आमचीची भूमिका आहे. परंतु दरवेळी राजकीय भूमिका बदलून वेगवेगळी विधाने करून नमो पर्यटन केंद्राला विरोध करणे योग्य नाही. फोडण्याची भाषा करतायेत, जे फोडतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. उद्या हा मनसैनिक कुठे असेल याची चिंता करा असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.