“ठाकरे ब्रॅण्ड संपलाय, बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे”; शिंदेसेनेची ठाकरे गटावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 16:13 IST2025-03-28T16:11:26+5:302025-03-28T16:13:19+5:30
Shiv Sena Sanjay Shirsat News: आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे, असे सांगत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने पलटवार केला.

“ठाकरे ब्रॅण्ड संपलाय, बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे”; शिंदेसेनेची ठाकरे गटावर टीका
Shiv Sena Sanjay Shirsat News: ठाकरे ब्रॅण्ड संपलेला आहे. बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे. बाळासाहेबांचे विचार जिवंत आहेत. ठाकरे गटावर आम्हाला बोलायची आवश्यकता वाटत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. त्यामध्ये कोणी आडवे आले, तर त्याला आडवे करण्याची ताकद आमच्यात आहे, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, ज्यांच्यासोबत राहायचे नाही, तुम्ही त्यांच्यासोबत राहत आहात. शरद पवार आणि राहुल गांधी यांच्याबरोबर तुम्ही केलेली आघाडी देशाने पाहिली आहे. हे तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही त्यांच्यासोबत संसार करा. आमचा संसार इथे चांगला सुरू आहे, असा टोला लगावला. सत्तेवर असल्यास गाढव देखील पॉवरफूल असतो. शिंदे गटाला अमित शाह यांच्या पलीकडे दिसत नाही. जोपर्यंत अमित शाह यांचे छत्र त्यांच्या डोक्यावर आहे, तोपर्यंत त्यांची अशी भाषा चालेल. पण रामकृष्ण ही गेले, तसे मोदी-शाह पण येतील-जातील इतकाच इशारा अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली होती. या टीकेचा खरपूस शब्दांत संजय शिरसाट यांनी समाचार घेतला.
ठाकरे गटाच्या नेत्याला तुम्ही काय म्हणणार? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे
कोरोना काळातील अडीच वर्षांत असाच एक जण सत्तेच्या खुर्चीत बसला होता, त्यालाही अशी उपमा देणे योग्य आहे का, त्यांचाच नेता अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिला. सत्तेवर बसलेल्या प्रत्येकाला जर गाढव म्हणायचे असेल, ठाकरे गटाच्या नेत्याला तुम्ही काय म्हणणार? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असे प्रत्युत्तर शिरसाट यांनी दिले. तसेच आसाराम बापू यांचे आजही मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत, तो त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे, त्याविषयी भाष्य करणे योग्य नाही, असे शिरसाट एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात एक गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे की, तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. तिचे वडील कोर्टात गेले आहेत. पोलिसांच्या रिपोर्टमधून अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. या सगळ्या बाबी पाहिल्यास पोलीस त्यांचा तपास करतील, माहिती कोर्टासमोर सादर करतील, हायकोर्ट जो काही निर्णय देईल, त्यानुसार कारवाई केली जाईल, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.