Minister mahadev jankar taking money for doctor's transfer | पशुवैद्यकांच्या बदल्यांसाठी स्वत: मंत्रीच घेतात पैसे!
पशुवैद्यकांच्या बदल्यांसाठी स्वत: मंत्रीच घेतात पैसे!

मुंबई : दरवर्षी पशुवैद्यकांच्या बदल्यात भ्रष्टाचार होतो. पशुसंवर्धन व दुगधविकास खात्याचे मंत्री, या विभागाचे सचिव, मंत्री कार्यालय व आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी या भ्रष्टाचारात गुंतले आहेत. मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विश्रामगृहातच बदल्यांसाठी दलाली घेतली जाते, असा गंभीर आरोप महाराष्ट्र पशुवैद्यक परिषदेत करण्यात आल्याने या खात्याचे मंत्री महादेव जानकर चांगलेच गोत्यात आले आहेत.


पशुवैद्यकांची सर्वोच्च संस्था मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेची २८ मे, २०१९ रोजी ३०वी सर्वसाधारण सभा परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेचे इतिवृत्त ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. या सभेत पशुवैद्यकांच्या बदल्यांबाबतचा विषय चर्चेत आला असता, सदस्यांनी शासनस्तरावर बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. डॉ. यशवंत वाघमारे यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. प्रत्येक वर्षी शासन स्तरावरून पशुवैद्यकांच्या बदल्या केल्या जातात, यामध्ये मोठ्या प्रमाणार भ्रष्टाचार होत असून, यात पदुमचे सचिव, पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथील अधिकारी व मंत्री गुंतलेले आहेत. अधिकाऱ्यांकडून पशुवैद्यकांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे बदल्यांबाबत सुनिश्चित कार्यपद्धती ठरवून बदल्यांमध्ये पारदर्शकता आणावी, अशी मागणी डॉ. वाघमारे यांनी केली. इतिवृत्तात या आरोपांची नोंद करण्यात आली असून, हे इतिवृत्त सर्व सदस्यांना पाठविण्यात आले आहे.


मंत्री-सचिवात बेबनाव
पशुसंवर्धन विभागातील बदल्यांवरून मंत्री महादेव जानकर आणि विभागाचे सचिव यांच्यात बेबनाव असल्याचे दोन महिन्यांपूर्वी उजेडात आले होते. बदली प्रक्रियेत विश्वासात घेतले नसल्याचे सांगत जानकर यांनी सचिवांनी केलेल्या ६६ अधिकाºयांच्या बदल्या त्यावेळी रद्द केल्या होत्या.
 

मंत्री म्हणून चार वर्षांच्या कारकिर्दीत आपण बदली, बढतीमध्ये पारदर्शकता आणली आहे. आपण स्वत: किंवा मंत्री कार्यालयातील कोणीही यात गुंतलेले नाही. हे आरोप चुकीचे आणि निराधार आहेत.
- महादेव जानकर,
मंत्री (पशुसंवर्धन व दुग्धविकास).

Web Title: Minister mahadev jankar taking money for doctor's transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.