घरकुल योजनांच्या निधीबाबत मंत्री अतुल सावेंची महत्त्वपूर्ण घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 21:12 IST2025-03-19T21:11:37+5:302025-03-19T21:12:05+5:30
अंबादास दानवे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

घरकुल योजनांच्या निधीबाबत मंत्री अतुल सावेंची महत्त्वपूर्ण घोषणा
Maharashtra Government: राज्यात राबवल्या जाणाऱ्या विविध घरकुल योजनांमधून लाभार्थ्यांना वेगवेगळे अनुदान दिले जाते. या योजनांना एकसारखे अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले असून त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेदरम्यान सभापती प्रा. शिंदे यांनी निर्देश दिले. सदस्य सर्वश्री विक्रम काळे, एकनाथ खडसे, भावना गवळी यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
मंत्री सावे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सध्या चार टप्प्यांमध्ये १.२० लाख रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवून देण्याबाबत तसेच या घरकुलांना पाच ब्रास वाळू देण्याबाबत देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील ३२९ लाभार्थ्यांची नोंदणी आवास सॉफ्ट प्रणालीवर करण्यात आली असून त्यापैकी २४१ लाभार्थ्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यापैकी १७१ लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला असून उर्वरित लाभार्थ्यांची पी एफ एम एस प्रणालीवर बँक खाते पडताळणी प्राप्त होताच पहिला हप्ता वितरित करण्यात येईल, असे सावे यांनी यावेळी सांगितले.