मंत्री आदित्य ठाकरेंची ७ वर्षांनी आजोळी भेट; जुने फोटो पाहून आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 22:34 IST2022-03-28T22:33:39+5:302022-03-28T22:34:38+5:30
आजोळच्या मंडळींकडून कोकणीपध्दतीत सरबराई, श्री कुणकेश्वर मंदिर येथील कार्यक्रम आटोपून त्यांनी तात्काळ दाभोळे येथील आजोळ असलेल्या पाटणकर यांचे घर गाठले.

मंत्री आदित्य ठाकरेंची ७ वर्षांनी आजोळी भेट; जुने फोटो पाहून आठवणींना उजाळा
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याच्या दौर्यावर आलेले राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सात वर्षांनी दाभोळे येथील आपल्या आजोळी भेट दिली.यावेळी नातवाचे जंगी स्वागत करून आजोळच्या मंडळींनी खास कोकणीपध्दतीत शहाळ्याचे पाणी देऊन सरबराई केली.
मंत्री आदित्य ठाकरे सोमवारी देवगड दौर्यावर होते. श्री कुणकेश्वर मंदिर येथील कार्यक्रम आटोपून त्यांनी तात्काळ दाभोळे येथील आजोळ असलेल्या पाटणकर यांचे घर गाठले. सात वर्षांनी नातू आजोळी आल्याने आजोळच्या मंडळींनी नातवाचे जंगी स्वागत केले. यावेळी त्यांनी आजोळच्या मंडळींशी संवाद साधला.देवदर्शन घेतले.जुने फोटोंचे अल्बम पाहून आठवणींना उजाळा दिला.झोपाळ्यावर बसून शहाळ्याचे पाणी घेत आजोळच्या मंडळींची विचारपूस केली.
सात वर्षांनी राज्याचा पर्यटन मंत्री झालेला नातू आजोळी आल्यानंतर आजोळच्या मंडळींना अत्यानंद झाला.सर्वांनी त्यांच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. जगप्रसिध्द असलेल्या देवगड हापूस आंब्याची पेटी नातवाला देवून आजोळच्या मंडळींकडून पाहुणचार करण्यात आला. यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत,शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, आमदार वैभव नाईक, दिपक केसरकर, शिवसेना नेते संदेश पारकर, तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलींद साटम आदी उपस्थित होते.