‘मिहान’ ला देणार विकासाचे पंख
By Admin | Updated: October 8, 2014 00:53 IST2014-10-08T00:53:23+5:302014-10-08T00:53:23+5:30
मिहान..मिहान...मिहान! गेल्या कित्येक वर्षांपासून विदर्भातील जनता याचे नाव ऐकत आहे. परंतु आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे ‘मिहान’ला वेगच घेता आला नाही. जर भाजपाची राज्यात सत्ता आली

‘मिहान’ ला देणार विकासाचे पंख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा : आघाडी सरकारच्या धोरणांवर टीका
नागपूर : मिहान..मिहान...मिहान! गेल्या कित्येक वर्षांपासून विदर्भातील जनता याचे नाव ऐकत आहे. परंतु आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे ‘मिहान’ला वेगच घेता आला नाही. जर भाजपाची राज्यात सत्ता आली तर केवळ ‘मिहान’चाच विकास होणार नाही तर या माध्यमातून संपूर्ण विदर्भ विभागाची अर्थनीती बदलेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. कस्तूरचंद पार्क येथे मंगळवारी आयोजित भाजपच्या प्रचारसभेत त्यांनी ‘मिहान’च्या मुद्याला हात घालत आघाडी सरकारवर टीका केली.
‘मिहान’च्या फाईल्सला मंत्रालयातील अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या विभागात जाण्यास चक्क १० वर्षे लागली. आघाडी सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे उपराजधानीच्या विकासाचा वेग मंदावला. पण भाजप मात्र ‘मिहान’चे कामच केवळ पूर्ण करणार नाही तर याचे उद्घाटनदेखील करेल, असे मोदी म्हणाले. केंद्र सरकारने विकासात्मक राजकारणावरच भर दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील गुंतवणुकीचा आकडा ७६ टक्क्यांनी वाढीस लागला आहे. याचा नवीन प्रकल्पांना फायदाच होईल, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील ‘मिहान’चा मुद्दा उचलून धरला. आघाडी सरकारमुळे ‘मिहान’ प्रकल्प रखडला. परंतु जर भाजपाची सत्ता आली तर १५ वर्षांत झाले नाही ते विकासाचे चित्र एका वर्षात उभे होईल, असा दावा गडकरी यांनी केला. ‘स्टॅम्प पेपर’वर ही बाब लिहून दाखविण्याची आपली तयारी असल्याचेदेखील ते म्हणाले.
केवळ ‘मिहान’च नव्हे तर गोसेखुर्दसारखा प्रकल्प आघाडी सरकारमुळे अजूनही पूर्ण होऊ शकलेला नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते केवळ सत्तेच्या मागे लागले व विदर्भाच्या विकासाकडे त्यांनी लक्षच दिले नाही, असे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
सभास्थळ हाऊसफुल्ल
नरेंद्र मोदी यांच्या आगमनाच्या काही वेळ अगोदरपर्यंत कस्तूरचंद पार्क येथील जवळपास ३० टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या. परंतु काही वेळातच संपूर्ण सभास्थळ खचाखच भरले. अनेक कार्यकर्ते बाहेर रस्त्यांवर उभे होते. नागपूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांशिवाय महाविद्यालयीन तरुणाईचीदेखील लक्षणीय उपस्थिती होत
फ्रेटस्, डॉ. पठाण, गुप्ता यांचा भाजप प्रवेश
माजी आमदार व्हिक्टर फ्रेटस्, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस.एन. पठाण व काँग्रेस नेते जयप्रकाश गुप्ता व राष्ट्रवादीच्या युवक शाखेच्या काही नेत्यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी धनगर समाज संघटनेचे पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्यासह विविध संघटनांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला.
स्वच्छतेसाठी ‘ग्रीन व्हिजिल’चा पुढाकार
नरेंद्र मोदी यांच्या कस्तूरचंद पार्क येथील सभास्थळी स्वच्छता राहावी, यासाठी तरुणाईने पुढाकार घेतला होता. ‘ग्रीन व्हिजिल’ या संघटनेच्या ३० हून अधिक कार्यकर्ते पाण्याच्या बॉटल्स, प्लास्टिक व इतर कचरा जमा करताना दिसून येत होते. यात विद्यार्थिनींचादेखील सहभाग होता. मोदी यांची सभा सुरू असताना दुसरीकडे या कार्यकर्त्यांचे सर्व लक्ष स्वच्छतेकडे लागले होते. मैदानातून बाहेर निघण्याअगोदर जवळपासचा कचरा उचलून कचरापेटीत टाकण्याचे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांकडून वारंवार करण्यात येत होते.