प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे प्रवासी हैराण
By Admin | Updated: January 21, 2017 01:38 IST2017-01-21T01:38:13+5:302017-01-21T01:38:13+5:30
पवन मावळ भागातील सोमाटणे, शिरगाव, धामणे, गोडुंब्रे भागातील कामगार, विद्यार्थी, शेतकरी व दूध व्यावसायिक बेगडेवाडी रेल्वे स्थानकाचा वापर करीत असतात

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे प्रवासी हैराण
देहूरोड : शेलारवाडी, कुंडमळा, इंदोरी, माळवाडी, कान्हेवाडीसह पवन मावळ भागातील सोमाटणे, शिरगाव, धामणे, गोडुंब्रे भागातील कामगार, विद्यार्थी, शेतकरी व दूध व्यावसायिक बेगडेवाडी रेल्वे स्थानकाचा वापर करीत असतात. घोरवडेश्वर डोंगरावर येणारे भाविक दर्शनासाठी या स्थानकावरून ये-जा करीत असतात. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या नाकर्तेपणाने येथील प्रवासी हैराण आहेत. अपुरे निवारा शेड, अपुरी बैठक व्यवस्था, घोरवडेश्वर डोंगराच्या बाजूला तिकीटघर, वाहनतळ व्यवस्था व स्वच्छतागृहांचा अभाव, आरक्षण सुविधा, फलाटांची दुरवस्था, निवारा शेडमध्ये ठेवलेल्या लोखंडी जाळ्या, स्थानकावरील अपुरी बैठक व्यवस्था व कुत्र्यांच्या दहशतीमुळे प्रवासी त्रस्त आहेत.
स्थानकावर प्रवेश करताच स्थानकाच्या नावाचा फलक झाडाझुडपात गेल्याचे दिसते. महामार्गाच्या बाजूने तिकीटघर नसल्याने लोणावळा, तळेगावकडे जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी दुसऱ्या बाजूला जावे लागते. या बाजूच्या प्रतीक्षालयाची दुरवस्था आहे. त्या ठिकाणची जमीन खचली आहे. फलाटावर असणारा सिमेंट गिलावा विविध ठिकाणी निघालेला आहे. दुसऱ्या बाजूप्रमाणे सिमेंट ब्लॉक बसविलेले नाहीत. फलाटालगत तारेचे कुंपण नसल्याने कोठूनही प्रवेश करणे शक्य आहे. निम्म्याहून अधिक भागातील फलाट खचलेला आहे. स्थानक परिसरात कमालीची अस्वच्छता आहे. दुर्गंधीने प्रवासी त्रस्त झाले आहेत. स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आहे.
तिकीटघराकडे अपंगांना जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने अपंगांचे हाल होत आहेत. दोन्ही फलाटांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मात्र, काही ठिकाणी पाण्याची गळती होत असून, पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी अस्वच्छता आहे. नळालगत ओट्यावर तंबाखू व गुटखा खाऊन थुंकल्याने पाणी पिण्याची इच्छा होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
दोन्ही फलाटावर फलाटावर ठिकठिकाणी कचराकुंड्या असतानाही काही प्रवासी बिस्कीट पुड्याचे कागद आदी कचरा त्यात टाकत नाहीत. फलाटावरील दोन्ही बाजूला काही भागात लोखंडी जाळ्या तुटल्या आहेत. इतरत्र लोखंडी जाळ्या व तारेचे कुंपण नसल्याने स्थानकावर सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे. कोणीही थेट फलाटावर प्रवेश करताना दिसून येतात. फलाटाची दुरवस्था झाली असून, विविध ठिकाणी फरशा निघाल्या आहेत. रंगरंगोटी केली नसल्याने निवारा शेड खराब दिसत आहेत. शेडमध्ये मोठे लोखंडी खांब ठेवले असल्याने अडथळे होत असून, पाणी पिण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागते. फलाटावर ठिकठिकाणी झाडेझुडपे व गवत दिसत आहे. (वार्ताहर)
>उन्हाळा, पावसाळ्यात हाल
बारा डब्याची लोकल सुरू झाल्यावर दोन्ही फलाटांची लांबी वाढविण्यात आली आहे, मात्र, वाढीव फलाटावर प्रवाशांच्या सोयीसाठी निवारा शेड बांधली नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे उन्हाळा व पावसाळ्यात हाल होत आहेत. प्रवाशांना निवारा शेडची गरज आहे.
भटक्या कुत्र्यांची दहशत
स्थानकावरील एकमेव जिन्यावर, तसेच फलाटावर कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून लोहमार्ग ओलांडत असतात. दोन्ही फलाटांवर सर्वत्र भटकी कुत्री फिरत असल्याने विशेषत: महिला व विद्यार्थी कुत्र्यांच्या दहशतीखाली असतात.
वाहनतळ, स्वच्छतागृहाची आवश्यकता
सोमाटणे, शिरगाव व पवन मावळ भागात नागरीकरण वाढत असल्याने, तसेच परिसरात शिक्षण संस्था उभ्या राहिल्या असल्याने या बाजूने येणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांची संख्या मोठी असतानाही या बाजूला तिकीटघराची सोय नाही. वाहनतळाची व्यवस्था नाही. महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह नाही. घाईच्या वेळी तिकीट काढण्यासाठी दुसऱ्या बाजूला जावे लागत असल्याने अनेकदा लोकल चुकते. स्थानकावर लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचा एकही जवान नसल्याने प्रवाशांची सुरक्षितता रामभरोसे आहे. घटना घडल्यास देहूरोड अगर तळेगाव येथे संपर्क साधावा लागतो.
एक्स्प्रेस थांबा नसल्याने गैरसोय
अनेकांना दररोज एक्स्प्रेस गाड्यांनी मुंबईसह विविध भागात प्रवास करावा लागतो. मात्र, स्थानकावर एकही एक्स्प्रेस थांबत नसल्याने वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना येथे थांबा देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.
आरक्षण केंद्राची गरज
या भागातील नागरिकांना रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी चिंचवड अगर पुणे येथे जावे लागत आहे. तिकीटघरात खिडक्या शिल्लक असल्याने त्या ठिकाणी आरक्षण सुविधा सुरू केल्यास प्रवाशांना सोयीचे होईल.