मेट्रोचा लोखंडी पिल्लर दुचाकीवर पडल्यानं दोघे जखमी, मेट्रो रेल्वेच्या अभियंत्यांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 22:59 IST2017-10-08T22:59:33+5:302017-10-08T22:59:46+5:30
मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी वापरला जाणारा लोखंडी कॉर्टर पिलर दुचाकीवर पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. तिची सासूही या अपघातात जखमी झाली.

मेट्रोचा लोखंडी पिल्लर दुचाकीवर पडल्यानं दोघे जखमी, मेट्रो रेल्वेच्या अभियंत्यांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी वापरला जाणारा लोखंडी कॉर्टर पिलर दुचाकीवर पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. तिची सासूही या अपघातात जखमी झाली. आजीच्या कडेवर असलेली जखमी महिलेची मुलगी सुदैवाने बचावली. सेंट्रल एव्हेन्यूवर रविवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
अमी जय जोशी (वय २४) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. हिवरीनगर, भीम चौक नंदनवन येथे राहणा-या अमी जोशी, दीड वर्षीय मिरा नामक मुलगी आणि सासू साधना जोशी यांच्यासह अॅक्टिव्हाने (एमएच ४९/ क्यू ०५३७) गांधीबागकडे जात होत्या. सेंट्रल एव्हेन्यूवरील छापरू नगर-आंबेडकर चौकाजवळच्या हनीशीला अपार्टमेंट समोर अचानक मेट्रोच्या कामासाठी लावलेला एक लोखंडी कॉर्टर पिल्लर जोशी यांच्या दुचाकीवर आदळला. त्यामुळे डोक्याला दुखापत होऊन अमी जोशी गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या मागे बसलेल्या सासू साधना यांनाही मार लागला.
सुदैवाने आजीच्या कडेवर असलेल्या चिमुकल्या मिराला मात्र दुखापत झाली नाही. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. या तिघींनाही तातडीने बाजुच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. जमाव वाढत असल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे तणावात मोठी भर पडली. वाहतूक पोलीस आणि लकडगंज पोलिसांचा ताफा पोहचला. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले.
वाहतूकही सुरळीत करण्यात आली. हा अपघात मेट्रोच्या अधिकारी आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा आरोप करून नागरिकांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी केली. त्यानंतर रुग्णालयात साधना जोशी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लकडगंजचे सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. अॅन्थोनी यांनी मेट्रोचे काम करणारे कमलकिशोर सुरेंद्रकुमार शर्मा (वय ४८, रा. सुभाषनगर नजिमाबाद, जि. बीजनौर), सहायक अभियंता निलेश पराते, नरेंद्र कुमार आणि शिशिर सिंग यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.