लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील स्वामी समर्थनगर ते कांजूरमार्गदरम्यान उभारल्या जाणाऱ्या मेट्रो ६ मार्गिकेच्या कारशेडचे काम अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे पश्चिम व पूर्व उपनगरांना जोडणारी ही मेट्रो मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुली होण्यास २०२८ उजाडण्याची चिन्हे आहेत. परिणामी सात वर्षे जागेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर)वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
मेट्रो ६ ची लांबी १५.३१ किलोमीटर असून, त्यावर १३ स्थानके उभारली जाणार आहेत. ‘जेव्हीएलआर’वरून पवईमार्गे ही मेट्रो पुढे जाणार आहे. या प्रकल्पावर सहा हजार ७१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. २०१८ मध्ये कामास सुरुवात झाली तेव्हा २०२२ च्या अखेरीस ही मार्गिका सुरू होईल, असा अंदाज होता. मात्र कारशेडच्या जागेच्या वादामुळे काम सतत रखडत गेले. काही प्रमाणात तो तिढा सुटल्याचे वाटत असतानाच केंद्र सरकारने मालकीचा दावा करत उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाच्या निर्देशानुसार, कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागेवरचे सर्व काम थांबले होते. या जागेवरील दावा राज्य सरकारने नुकताच सोडला आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या सॉल्ट पॅन विभागाने या जागेवरील याचिका मागे घेतली आहे. तसेच कारशेडसाठी जागा दिली आहे. मात्र या जागेच्या मालकीवर दावा करणाऱ्या याचिका खासगी व्यक्तींनी केल्या असून, त्या केसचा तिढा सुटेपर्यंत कारशेडच्या कामाला सुरुवात होऊ शकणार नाही. त्यामुळे या मेट्रोलाही मोठा विलंब होणार आहे.