पाणी ओसरल्यानंतर पुरग्रस्त भागात रोगराई पसरण्याची भीती, अमित देशमुखांनी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 15:57 IST2021-07-26T15:55:34+5:302021-07-26T15:57:05+5:30
Maharashtra Flood: 'राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन जनतेची मदत करण्याची ही वेळ आहे.'

पाणी ओसरल्यानंतर पुरग्रस्त भागात रोगराई पसरण्याची भीती, अमित देशमुखांनी घेतला मोठा निर्णय
मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तर महापूराची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आता या पुराचे पाणी ओसरत असले तरी, नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लेप्टो, डेंग्यूसह इतर साथीचे रोग पसरु नयेत यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यात मेडीकल कॅम्प उभारले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
पाऊस कमी झाल्यामुळे पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. पण, त्यामुळे चिखल आणि घाणीचे साम्राज्य प्रत्येक गावात पाहायला मिळत आहे. यामुळे रोगराई वाढण्याची भीती आहे. दरम्यान, या प्रत्येक जिल्ह्यात आता मेडिकल कॅम्प उभारले जाणार आहेत. याबाबत बोलताना अमित देशमुख म्हणाले की, ही परिस्थिती खूप भीषण आहे. आता महापुरानंतर लेप्टो, डेंग्यू आणि इतर साथीचे रोग पसरू नये यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यात मेडीकल कॅम्प उभारले जाणार आहेत. तिथल्या तिथे मेडीकल सुविधा पोहोचवण्यासाठी डॉक्टरांची टीम रवाना केली आहे. राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन जनतेची मदत करण्याची ही वेळ आहे.
दोन दिवसांपूर्वीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील पूरस्थिग्रस्त नागरिकांना लागणारी सर्व मदत राज्य सरकारकडून केली जाईल, असे सांगितले आहे. तसेच, आरोग्य विभागाच्या दृष्टीनं पुराच्या तडाख्यात सापडलेल्या गावात एक डॉक्टर आणि नर्सेस यांचा गट तयार करुन ठेवण्यात आला आहे. त्यासोबत आरोग्यविषयक सर्व साहित्य, औषधांची कुमक पाठवण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.