नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:32 IST2025-12-12T11:28:53+5:302025-12-12T11:32:21+5:30
लोकसभेचे १० वे अध्यक्ष म्हणूनही शिवराज पाटील चाकूरकर यांनी काम केले. जवळपास ४ दशके ते अनेक महत्त्वाच्या पदावर काम करत होते.

नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
लातूर - काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे त्यांचे गाव होते. शिवराज पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशातील राजकीय क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. शिवराज पाटील यांचा राजकीय प्रवास कुणीही विसरू शकत नाही. लातूरचे नगराध्यक्ष ते पंजाबचे राज्यपाल अशी त्यांची कारकिर्द राहिली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन
लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे १२ ऑक्टोबर १९३५ साली शिवराज पाटील यांचा जन्म झाला. शांत स्वभाव आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी राजकारणात आपला ठसा उमटवला. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर हळूहळू त्यांनी राजकीय जीवनात पाऊल ठेवले. राज्यातील विधानसभेसोबतच संसदेतील लोकसभा, राज्यसभेत त्यांनी प्रतिनिधित्व केले. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी ते एक होते. लोकसभेचे १० वे अध्यक्ष म्हणूनही शिवराज पाटील चाकूरकर यांनी काम केले. जवळपास ४ दशके ते अनेक महत्त्वाच्या पदावर काम करत होते.
१९८० मध्ये शिवराज पाटील चाकूरकर पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर सातत्याने २००४ पर्यंत ते लोकसभेत सात वेळा खासदार म्हणून जिंकले. १९८०-९० च्या दशकात संसदेतील संसदीय सदस्य सॅलरी आणि अलाऊन्सवर बनलेल्या जाँईट कमिटीत त्यांनी काम केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात त्यांनी संरक्षण राज्य मंत्री म्हणून काम केले. २००४ ते २००८ या काळात शिवराज पाटील हे देशाचे गृहमंत्री होते. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत शिवराज पाटील यांनी ३० नोव्हेंबरला गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रीय राजकारणात येण्यापूर्वी शिवराज पाटील दोनदा विधानसभेवर निवडून आलेत.
नगराध्यक्ष ते राज्यपाल...
शिवराज पाटील चाकूरकर हे लातूरचे नगराध्यक्ष होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात लातूर नगरपालिकेतून केली आणि ३ वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केले. दोन वेळा लातूरमधून आमदार झाले. महाराष्ट्रात राज्यमंत्री होते. त्यानंतर सात वेळा खासदार म्हणून निवडून आले. लोकसभा सभापती, केंद्रीय गृहमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल यासारखी महत्त्वाची पदे भूषविली. शिवराज पाटील चाकूरकर यांनी नगराध्यक्ष पदाच्या काळात शहराच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक जडणघडणीत मोठे योगदान दिले. त्यांनी टाऊन हॉलमध्ये ग्रंथालय सुरू केले आणि त्यांच्याच काळात लातूरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते.