बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
By सोमनाथ खताळ | Updated: December 24, 2025 22:34 IST2025-12-24T22:32:40+5:302025-12-24T22:34:14+5:30
Fire in Beed's 'Sahyadri Devrai': बीड शहराच्या जवळ असलेल्या आणि अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'सह्याद्री देवराई' प्रकल्पाला आज बुधवारी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.

बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
बीड - बीड शहराच्या जवळ असलेल्या आणि अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'सह्याद्री देवराई' प्रकल्पाला आज बुधवारी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत डोंगरावरील हजारो छोटी-मोठी झाडे होरपळून निघाली असून, निसर्गप्रेमींमधून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी उशिरा ९ वाजेच्या सुमारास डोंगराच्या एका भागातून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले आणि ती संपूर्ण डोंगररांगेत पसरली. आगीची माहिती मिळताच वन विभाग आणि बीड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. डोंगराळ भाग आणि चढ-उतार असल्याने आग विझवताना जवानांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागला. वन कर्मचारी आणि स्थानिक तरुण आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.
काही वर्षांपूर्वी अभिनेता सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन बीडच्या या ओसाड डोंगरावर 'सह्याद्री देवराई' हा महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण प्रकल्प राबवला होता. हजारो वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्यात आले होते. बघता बघता या डोंगराचे रूपांतर एका हिरव्यागार वनक्षेत्रात झाले होते. मात्र, आज लागलेल्या या आगीमुळे या श्रमावर पाणी फेरले जाण्याची भीती निर्माण झाली आहे.या आगीत प्रामुख्याने दुर्मिळ देशी वृक्ष, औषधी वनस्पती आणि नव्याने लावलेली रोपे जळून खाक झाली आहेत. तसेच डोंगरावरील जैवविविधतेलाही मोठा फटका बसला आहे. ही आग नैसर्गिक कारणाने लागली की कुणी जाणीवपूर्वक लावली, याचा तपास आता वन विभाग करत आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.