शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:37 IST2025-08-05T10:36:31+5:302025-08-05T10:37:21+5:30
हा प्रकार पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करणारा असून त्याची योग्य ती दखल पक्ष घेईल असा दुजोरा शिंदेसेनेच्या नेत्याने दिला.

शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
अहिल्यानगर - अलीकडच्या काळात सत्ताधारी पक्षात प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागली आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्यांची मोठी यादी आहे. मात्र याच पक्षप्रवेशावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अहिल्यानगर इथल्या एका नेत्याने शिंदेसेनेत प्रवेश करताना एक दोन नव्हे तर तब्बल ४०-५० नावांची बोगस यादी पक्षाला दिली. आता यातील बरेच जण पुढे येऊन त्यांचा खुलासा करत आहेत त्यामुळे शिंदेसेनेची नाचक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
अकोले तालुक्यातील पंचायत समितीचे उपसभापती मारूती मेंगाळ यांनी ३ महिन्यांपूर्वी २६ एप्रिलला त्यांच्या समर्थकांसह शिंदेसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नेत्यांचा ठाणे येथे पक्षप्रवेश झाला. या पक्षप्रवेशात अनेक गावचे सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी यांचा समावेश होता. या शक्तीप्रदर्शनाने पक्षाची ताकद वाढणार असा दावा केला जात होता. परंतु मेंगाळ यांनी दिलेल्या पक्षप्रवेशाच्या यादीत अनेक बोगस नावांचा समावेश करण्यात आल्याचा आरोप झाला आहे. या यादीत नाव असणाऱ्यांपैकी काही जणांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून आम्ही पक्षप्रवेश केला नसल्याचं स्पष्ट केले आहे.
तर मेंगाळ यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत माहिती पक्षाने आम्हाला दिली नव्हती. काही दिवसांपूर्वी यादी समोर आली तेव्हा त्यातील ४०-५० नावे बोगस असल्याचं आढळून आले. हा प्रकार पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करणारा असून त्याची योग्य ती दखल पक्ष घेईल. यावर कठोर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी केली आहे.
दरम्यान, ९ ऑगस्टला आदिवासी दिनाचे औचित्य साधून मारूती मेंगाळ यांनी अकोले येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच मेंगाळ यांच्या पक्षप्रवेश घोटाळ्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. आता पक्षाची दिशाभूल केल्याप्रकरणी पक्ष मेंगाळ यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.