जगात, देशात, कुठेही पहा. वावड्यांचा बाजार सध्या तेजीत आहे. कुणीही उठावे आणि वावडी उठवावी. प्रकाशाच्या वेगाला थक्क करील अशा गतीने ती सर्वत्र पसरत जाते. ती वावडी असली तरीही त्यावर चर्चा झडू लागतात, वाद सुरू होतात, व्हॉट्सअ‍ॅप-ट्विटर तज्ज्ञ तावातावाने मते मांडतात. नेते प्रतिक्रिया देतात आणि त्या प्रतिक्रियांवर नवीन वावड्यांची धूम उठते. वस्तुस्थिती काय आहे, खरोखर काय घडले आहे किंवा खरेच कुणी काय वक्तव्य केले आहे, याची शहानिशा करण्याची फिकीर कोणाला नाही. कोविडसारखी महामारी समोर ठाकल्यावर नेतेमंडळी व माध्यमवीर थोडा गंभीरपणे विचार करू लागतील, विज्ञान-शास्र, अर्थशास्र याच्या आधाराने बोलतील असे प्रथम वाटत होते. परंतु तसे काहीच झाले नाही. उलट वावड्यांमध्ये अधिकाधिक लोक रस घेऊ लागले. रिकामपणी चघळायला वावडी बरी पडते हेही यामागील कारण असू शकेल. सुशांतसिंह प्रकरणापासून याला सुरुवात झाली आणि त्यानंतर वावड्यांच्या लाटांवर लाटा उठू लागल्या.

सध्या महाराष्ट्रात लाट आहे ती ‘ठाकरे सरकार डगमगू लागले आहे काय?’ या वावडीची. कोरोनाबाबत जशी अधूनमधून भलतीच नवी माहिती पुढे येते तशी ठाकरे सरकारच्या अस्थिरतेची वावडी वारंवार उठते आणि आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. एखादे क्षुल्लक वक्तव्य त्यासाठी पुरते. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडील भेटीनंतर अशीच वावडी उठली. ही भेट म्हणजे राजकीय भूकंप असे वर्णन चित्रवाहिन्यांवर केले गेले. भूकंपासारखे विशेषण कधी वापरायचे याचे भान सामान्य वकुबाच्या अँकरना नसले तरी भेटीत काय झाले याची माहिती घेण्यापूर्वीच ट्विटर तज्ज्ञांनी राजकीय आडाखे बांधायला सुरुवात करावी हे आश्चर्यकारक होते. ‘शिवसेना-भाजपचे मनोमीलन जणू झालेच’, अशा रितीने बातम्या येण्यास सुरुवात झाली. मग त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘सरकार कसे स्थिर आहे’ याचे दाखले येऊ लागले. या दाखल्यांना वजन यावे म्हणून महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी पाण्यात देव घालून मोदी कसे बसले आहेत याच्या कहाण्या प्रसारित होऊ लागल्या. भाजपचे नेतेही या कहाण्यांमध्ये रंग भरू लागले. देवदयेने जनतेची सेवा करण्यास निघालेले ठाकरे सरकार पाडायचे हा केंद्र सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे ही एक बाजू, तर ठाकरे सरकार आपोआप पडणार आहे, आम्ही कशाला पाडू ही दुसरी बाजू ! यात राजकीय वस्तुस्थिती काय आहे याचा पत्ता कोणालाच नाही. वस्तुस्थिती जाणून घेण्याची कोणाला इच्छाही नाही. एका वावडीचा प्रतिवाद करण्यास दुसरी वावडी अशी वावड्यांची रंजक सिरिअल सध्या महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात सुरू आहे.

कोविडसारखी महामारी अनेक बाजंूनी नागरिकांना हतबल करीत असताना वावड्यांचा असा बाजार मांडणे हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. कोविडच्या परिणामांचे वास्तव भीषण आहे. संसर्ग झाला नसेल तर तो कधीही होईल याची धास्ती आहे, संसर्ग होऊन गेला असेल तर तो पुन्हा होण्याची धास्ती आहे, नोकरी टिकेल का ही भीती आहे, नोकरी टिकली तरी मिळणाऱ्या पगारात कौटुंबिक गरजा तरी भागतील का, या विचाराने नागरिक अस्वस्थ आहेत. उद्याच्या आयुष्याची खात्री नाही आणि आयुष्य टिकले तरी ते सुदृढ व सुखकर असेल का याचीही शाश्वती नाही. अशाश्वतेचे दाट सावट सध्या सर्वसामान्य मतदारांवर पडलेले आहे. राज्य कोणाचे आहे व ते किती काळ टिकणार आहे याची काळजी करण्याच्या मन:स्थितीत सध्या नागरिक नाहीत. जे राज्य आहे ते अशाश्वतेचे सावट दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे का हा नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. कार्यक्षम राज्यकारभार करणे जमत नसल्यामुळे वावड्या उठवल्या जातात का, मग त्या दिल्लीतील असोत वा मुंबईतील, असा प्रश्न यामुळे नागरिकांना पडतो. वावड्यांच्या भूलभुलय्यात नागरिकांना गुंग करून अपयश झाकता येईल असे नेत्यांना व त्यांच्यामागे फरफटत जाणाºया मीडियाला वाटत असेल तर ते वास्तवापासून दूर आहेत. वावड्यांचा बाजार मांडून टीआरपी मिळत असला तरी नागरिकांचा विश्वास मिळत नाही, मग ते नेते असोत वा माध्यमे !राज्य कोणाचे आहे व ते किती काळ टिकणार आहे; याची काळजी करण्याच्या मन:स्थितीत सध्या नागरिक नाहीत. जे कुणी राज्यकर्ते राज्य करीत आहेत, ते अशाश्वततेचे सावट दूर करण्यासाठी काय करतात, हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The market for vultures, shiv sena and bjp alliance again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.