मराठवाडा, खान्देशात ४५% मुलींचे विवाह अल्पवयातच, आरोग्य मंत्रालयाचे पाचवे कुटुंब सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 05:40 IST2020-12-20T05:39:40+5:302020-12-20T05:40:02+5:30
family survey of the Ministry of Health : देशभरातील कुटुंबांची सखोल व अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी दर चार वर्षांनी हे सर्वेक्षण केले जाते. २०१९-२० मधील ताज्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मराठवाडा, खान्देशात ४५% मुलींचे विवाह अल्पवयातच, आरोग्य मंत्रालयाचे पाचवे कुटुंब सर्वेक्षण
- अविनाश साबापुरे
यवतमाळ : एकीकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा दिला जात असताना, महाराष्ट्रात २१.९ टक्के मुलींना अल्पवयातच बोहल्यावर चढविले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या पाचव्या कुटुंब सर्वेक्षणातून मुलींच्या बालविवाहाचे हे गंभीर तथ्य पुढे आले आहे. त्याहून काळजीची बाब म्हणजे मराठवाडा, खान्देश या दुष्काळी भागात बालविवाहांचे प्रमाण तब्बल ४५ टक्क्यांच्याही पुढे गेले आहे.
देशभरातील कुटुंबांची सखोल व अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी दर चार वर्षांनी हे सर्वेक्षण केले जाते. २०१९-२० मधील ताज्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातून महाराष्ट्रात मुलींच्या बालविवाहांचे प्रमाण २१.९ टक्के असल्याचे स्पष्ट होते. चार वर्षांपूर्वी २०१५-१६ मधील सर्वेक्षणातून महाराष्ट्रात २६.३ टक्के बालविवाह होत असल्याची आकडेवारी पुढे आली होती. चार वर्षांत ही आकडेवारी चार टक्क्यांनी घटली आहे. महाराष्ट्रातील बालविवाहांचे सरासरी प्रमाण चार टक्क्यांनी घटले असले, तरी जिल्हानिहाय विचार करता, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील बालविवाह मात्र वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षण वाढले, बालविवाह घटले
ज्या जिल्ह्यांमध्ये महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे, तेथे बालविवाह कमी झाले आहेत. सर्वेक्षणानुसार. राज्यातील शिक्षित महिलांचे प्रमाण ८४.६ टक्के आहे, तर बालविवाहांचे प्रमाण २१.९ टक्के आहे. विशेष म्हणजे, शहरी भागात ९०.२ टक्के महिला शिक्षित असूनही तेथे १५.७ टक्के बालविवाह झाले.
मराठवाडा
औरंगाबाद ३५.८%
नांदेड ३२.२%
लातूर ३१%
जालना ३५%
परभणी ४८%
हिंगोली ३७.१%
बीड ४३.७%
उस्मानाबाद ३६.६%
पश्चिम महाराष्ट्र
पुणे २४%
सातारा १८.१%
सांगली २७%
कोल्हापूर २१%
सोलापूर ४०.३%
कोकण
पालघर १४.६%
ठाणे १८.४%
मुंबई ४.५%
मुंबई उपनगर १०%
रायगड १६%
रत्नागिरी ४.४%
सिंधुदुर्ग ५%
उत्तर महाराष्ट्र
नाशिक २९.६%
अहमदनगर २६.९%
धुळे ४०.५%
नंदुरबार २४%
जळगाव २८%
विदर्भ
यवतमाळ ११.७%
गडचिरोली १०.१%
नागपूर ७.१%
वर्धा ९%
वाशिम २७.७%
गोंदिया ६.५%
चंद्रपूर ९%
भंडारा १.५%
अमरावती ९.८%
अकोला १३.५%