मराठवाड्यात दानवे, पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला
By Admin | Updated: February 15, 2017 00:45 IST2017-02-15T00:45:13+5:302017-02-15T00:45:13+5:30
मराठवाड्यातील जिल्हा परिषदांची निवडणूक रंजक बनली आहे. सत्तेवर असलेले शिवसेना आणि भाजपा हे एकमेकांसाठी विरोधी पक्ष

मराठवाड्यात दानवे, पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला
मराठवाड्यातील जिल्हा परिषदांची निवडणूक रंजक बनली आहे. सत्तेवर असलेले शिवसेना आणि भाजपा हे एकमेकांसाठी विरोधी पक्ष असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे खरे विरोधक वळचणीला पडले. काही ठिकाणी घराणेशाही उघडपणे पुढे आली, तर काही ठिकाणी भाऊबंदकीने कलह मांडला. या निवडणुकीचा मुहूर्त साधून अनेक नेत्यांनी आपल्या वारसदारांचे लाँचिंग केले. अशा अनेक अर्थाने ती रंजक असली तरी भाजपा विरुद्ध सारे असेच चित्र आहे. पक्षांमधील अंतर्गत कलह, गटबाजीची वाफही बाहेर पडताना दिसते. साऱ्यांनाच भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. कारण ही निवडणूक भाजपा वगळता सर्वांच्याच अस्तित्वाचा प्रश्न ठरणारी, तर भाजपासाठी इभ्रतीचा प्रश्न आहे.
औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या ताब्यात जिल्हा परिषद होती. ती कायम ठेवण्यासाठी आटापिटा करावा लागणार. सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री या तालुक्यांत त्यांची परिस्थिती भक्कम; पण सिल्लोडमध्ये आ. अब्दुल सत्तार यांनाच काँग्रेस नेत्यांनी एकाकी पाडलेले दिसते. एकाही नेत्याने सिल्लोडमध्ये सभा घेतली नाही. फुलंब्रीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना माजी आ. कल्याण काळे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर जेरीला आणले आणि संघटना भक्कम केली. इतर तालुक्यांमध्ये संघर्ष हा भाजपा-सेनेत आहे. वैजापुरात माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या दोन सुना काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांकडून लढत असून, बाबांचे दोन डगरींवर पाय, अशी चर्चा जिल्हाभर आहे.
जालन्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली. कारण नगरपालिका निवडणुकीत त्यांना जालना शहरात बस्तान बसवता आले नाही. आता अर्जुन खोतकर आणि भास्कर आंबेकर या सेनेच्या जोडीने त्यांची दमछाक करण्याचा प्रयत्न केला. माजी आ. चंद्रकांत दानवे आणि आ. राजेश टोपे यांचाही तेवढाच विरोध असल्याने जालन्याची निवडणूक चांगलीच रंगली आहे. बीडमध्ये मुंडे घराण्यातील भाऊबंदकीचा अध्याय या निवडणुकीत पुढे चालू राहिला. पंकजा विरुद्ध धनंजय, असा कलगीतुरा या वेळीही गाजतोय आणि गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेचा वाद यानिमित्ताने चांगलाच उफाळला. बीडमध्ये क्षीरसागर घराण्यातील काका-पुतण्यांचा संघर्ष कायम राहिला.
उस्मानाबादमध्ये खा. रवींद्र गायकवाड यांचे चिरंजीव किरण, भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव चालुक्यांचे पुत्र संताजी, आमदार बसवराज पाटलांचे पुत्र शरण, आ. मधुकरराव चव्हाणांचे पुत्र बाबूराव, परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरेंचे चिरंजीव आदित्य ही वारसदार मंडळी पुढे सरकवली गेली. दिग्गजांच्या लढती असल्यामुळे चुरस वाढली. उस्मानाबादेत ही स्थिती, तर लातूरमध्ये दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे चिरंजीव धीरज हे रिंगणात उतरले. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजपा लढतीचे रूपांतर ‘देशमुख विरुद्ध निलंगेकर’ असे झाले.
परभणी बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र येऊन पॅनल तयार केले व निवडणूक जिंकली. त्या वेळेसपासून काँग्रेस-शिवसेनेच्या छुप्या युतीची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. पाथरी तालुक्यातील लढती व मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान लक्षात घेता, या आरोपाला पुष्टी मिळत आहे. या तालुक्यातील ५ पैकी ४ जागांवर काँग्रेसने उमेदवार दिलेला नाही. दुसरीकडे अंतर्गत मतभेदामुळे दूर गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना परवा जिंतूर येथे सभेच्या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या.
हिंगोली जिल्हा परिषदेत सध्या शिवसेनेची सत्ता असून त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. तर सेना व भाजपा मात्र वेगवेगळे लढत आहेत. मागच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक जागा थोड्या फरकाने पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे या वेळी त्यांनी आघाडी करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यातही सहा ते सात ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. शिवसेनेचे संख्याबळ कमी होण्याची शक्यता असली तरीही क्रमांक एकवर हाच पक्ष राहील, असे चित्र आहे.
नांदेड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारत जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते़ नांदेडचा सातबारा कोणा एकाच्या नावावर नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता केली होती़ त्याचे उलट परिणाम होऊन पालिका निवडणुकीत कुंडलवाडी वगळता भाजपाला कुठेही यश मिळाले नाही़ जिल्हा परिषदेच्या प्रचारातही मुख्यमंत्र्यांनी नांदेडकडे लक्ष वेधले़ ७० वर्षांतील विकासाचा अनुशेष अडीच वर्षात भरून काढल्याचे सांगितले़ त्याला खरमरीत उत्तर देताना काँग्रेसने ७० वर्षांत तुमचीही ५ वर्षे होती अशी बोचरी टीका केली़ शिवसेनेचे ४ आणि भाजपाचे १ आमदार असे सत्ताधारी संख्याबळ असल्याने किती गुण मिळवितात याकडे सर्वांचे लक्ष आहे़