मराठी तरुणांना गुजरातमध्ये मारहाण!
By Admin | Updated: July 19, 2014 01:50 IST2014-07-19T01:50:23+5:302014-07-19T01:50:23+5:30
नोकरीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये दिले नाही, म्हणून मुंबईतील १२ मराठमोळ्या मुलांना घरात घुसून मारल्याचा प्रकार गुजरातमधील अंकलेश्वर येथे घडला आहे.

मराठी तरुणांना गुजरातमध्ये मारहाण!
मुंबई : नोकरीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये दिले नाही, म्हणून मुंबईतील १२ मराठमोळ्या मुलांना घरात घुसून मारल्याचा प्रकार गुजरातमधील अंकलेश्वर येथे घडला आहे. बुधवारी घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर भेदरलेल्या कामगारांनी आहे त्या स्थितीत मुंबईत गाठली. श्रमिक उत्कर्ष सभा या कामगारांच्या संघटनेने शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या धक्कादायक प्रकाराला वाचा फोडली.
घडल्याप्रकाराबाबत सांगताना पीडीत कामगार सुरेंद्र डोगांवकर म्हणाला, ‘मे महिन्यात कंपनीत कामाला लागल्याच्या पहिल्या दिवसापासून स्थानिक कामगार संघटनेचा नेता विशाल गुप्ता १२ जणांना त्रास देत आहे. पहिल्याच दिवशी सर्वांना एका बंद खोलीत डांबण्यात आले. त्यानंतर सातत्याने दिसेल तिथे शिवीगाळ करणे, धमकावणे असा प्रकार सुरू होता. या प्रकाराबाबत विचारणा केली असता स्थानिक कामगार नोकरीत लागताना युनियनला दोन लाख रुपये देतात, असे कळाले. मुंबईच्या १२ कामगारांमुळे युनियनचे २४ लाखांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी खडसावून सांगितले.
वारंवार पैसे मागूनही पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ११ जुलै रोजी मुंबईहून आलेल्या सर्व कामगारांना मारहाण करण्यात आली. त्याची तक्रार मॅनेजमेंटकडे केली. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. बुधवारी मध्यरात्री गुप्तासोबत काही जण मद्यधुंद अवस्थेत घरात शिरले. त्यांनी जबर मारहाण करण्यास सुरूवात केल्यानंतर मुंबईकडे पळ काढण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. हा सर्व प्रकार सांगताना सुरेंद्रच्या डोळ््यातील भीती स्पष्टपणे जाणवत होती. (प्रतिनिधी)