मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक गंगाधर गाडगीळ जयंती

By Admin | Published: August 25, 2016 09:03 AM2016-08-25T09:03:57+5:302016-08-25T09:03:57+5:30

मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक गंगाधर गाडगीळ यांची आज (२५ ऑगस्ट) जयंती

Marathi writer, economist and philanthropist Gangadhar Gadgil Jayanti | मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक गंगाधर गाडगीळ जयंती

मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक गंगाधर गाडगीळ जयंती

googlenewsNext

प्रफुल्ल गायकवाड

मुंबई, दि. २५ -  मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक गंगाधर गाडगीळ यांची आज (२५ ऑगस्ट) जयंती. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते.

 
 
शिक्षण
मुंबईत २५ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी जन्मलेल्या गाडगीळांचे शालेय शिक्षण गिरगावातील 'आर्यन एज्युयूकेशन सोसायटी'च्या शाळेत झाले. या शाळेत इ.स. १९३८ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्यांनी चर्नीरोड येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांमधून एमए केले.
 
कारकीर्द
एमए झाल्यानंतर दोन वर्षांनी गाडगीळ यांनी आपल्या प्राध्यापकीला सुरुवात केली. आरंभीच्या काळात सुरतच्या किकाभाई प्रेमचंद या महाविद्यालयात व नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. इ.स. १९६४ ते इ.स. १९७१ या काळात ते मुंबईच्या नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड इकॉनॉमिक्सचे प्राचार्य होते. इ.स. १९७१ तेइ.स. १९७६ या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योगसमूहात आर्थिक सल्लागार ही पदे त्यांनी सांभाळली.
 
साहित्यिक कारकीर्द
लहानपणापासून गाडगीळांना वाचनाची आवड होती. त्यातूनच पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. 'प्रिया आणि मांजर' ही त्यांची पहिली कथा जून इ.स. १९४१ मध्ये 'वाङ्मयशोभा' या मासिकात प्रकाशित झाली. पुढे बरीच प्रसिद्धी मिळालेली 'बाई शाळा सोडून जातात' ही त्यांची कथा देखील 'वाङ्मयशोभा' याच मासिकात इ.स. १९४४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. काही कालावधीनंतर 'मानसचित्रे' हा त्यांचा पहिला कथासंग्रह इ.स. १९४६ साली प्रकाशित झाला.
 
यानंतर ठरावीक काळाने त्यांचे लेखन प्रकाशित होत राहिले. विशेषतः कडू आणि गोड (इ.स. १९४८), नव्या वाटा (इ.स. १९५०), भिरभिरे (इ.स. १९५०), संसार (इ.स. १९५१), उध्वस्त विश्व (इ.स. १९५१), कबुतरे (इ.स. १९५२), खरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४), तलावातले चांदणे (इ.स. १९५४), वर्षा (इ.स. १९५६), ओले उन्ह (इ.स. १९५७) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. वेगळी वाट चोखाळणाऱ्या या कथासंग्रहांमुळेच 'नवकथेचे अध्वर्यू' हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले.
 
भूषवलेली पदे
इ.स. १९५५ मध्ये पंढरपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात कथाशाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुढे इ.स. १९५७ मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची एक वर्षाची अभ्यासवृत्ती घेऊन ते हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. मध्यप्रदेश मधीलरायपूर येथे इ.स. १९८१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ऑक्टोबर १ इ.स. १९८३ रोजी मुंबईत झालेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन गाडगीळांच्या हस्ते झाले होते.
 
'मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठी साहित्य महामंडळ' या संस्थांचे अध्यक्ष तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मुंबईतील ग्राहक पंचायतीत सुमारे ३५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच ग्राहक पंचायतीचे ते २५ वर्षे अध्यक्ष देखील होते. एका बाजूला उद्योजक संस्थांचे सल्लागार तर दुसऱ्या बाजूला ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कामांचा त्यांनी उत्तम समन्वय साधलेला होता.
 
साहित्य
गंगाधर गाडगीळ यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे :
 
कथासंग्रह
कडू आणि गोड (इ.स. १९४८)
भिरभिरे (इ.स. १९५०)
संसार (इ.स. १९५१)
उद्ध्वस्त विश्व (इ.स. १९५१)
कबुतरे (इ.स. १९५२)
खरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४)
तलावातले चांदणे (इ.स. १९५४)
वर्षा (इ.स. १९५६)
ओले उन्ह (इ.स. १९५७) काजवा 
बंडू 
पाळणा 
 
कादंबऱ्या
लिलीचे फूल (इ.स. १९५५)
दुर्दम्य (खंड १: इ.स. १९७० आणि खंड २: इ.स. १९७१)
प्रारंभ (इ.स. २००२)
गंधर्वयुग
 
प्रवासवर्णने
गोपुरांच्या प्रदेशात (इ.स. १९५२)
साता समुद्रापलीकडे (इ.स. १९७९)
चीन एक अपूर्व अनुभव (इ.स. १९९३)
नायगाराचं नादब्रह्म (इ.स. १९९४)
हिममय अलास्का
 
नाटके
वेड्यांचा चौकोन (इ.स. १९५२)
ज्योत्स्ना आणि ज्योती (इ.स. १९६४)
बंडूकथा आणि फिरक्या (इ.स. १९७६)
रहस्य आणि तरुणी
 
समीक्षा ग्रंथ
खडक आणि पाणी (इ.स. १९६०)
साहित्याचे मानदंड (इ.स. १९६२)
पाण्यावरची अक्षरे (इ.स. १९७९)
आजकालचे साहित्यिक (इ.स. १९८०)
 
गौरव
अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, रायपूर, इ.स. १९८१
 
पुरस्कार
इ.स. १९९६ चा साहित्य अकादमी पुरस्कार – 'एका मुंगीचे महाभारत'
जनस्थान पुरस्कार
वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधीतर्फे मराठी साहित्यात प्रायोगिक व नावीन्यपूर्ण लेखन करणाऱ्या लेखकाला इ.स.१९९४ सालापासून दर तीन वर्षांनी, ’गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ दिला जातो.
 
१५ सप्टेंबर २००८ साली त्यांचे निधन झाले. 
सौजन्य :  मराठी विकिपीडिया  
 

Web Title: Marathi writer, economist and philanthropist Gangadhar Gadgil Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.