दोन ठाकरेंची ‘मराठी सुरक्षा’ की काँग्रेससारखीच ‘स्व’सुरक्षा..?
By अतुल कुलकर्णी | Updated: July 14, 2025 09:54 IST2025-07-14T09:53:09+5:302025-07-14T09:54:31+5:30
मुंबई, ठाणे आणि नऊ महानगरपालिका क्षेत्रांत दोन्ही ठाकरेंचे कार्यकर्ते, पदाधिकारी मनाने एकत्र झाले आहेत, पण राज ठाकरे यांनी स्वतःची राजकीय भूमिका अजूनही जाहीर केली नाही.

दोन ठाकरेंची ‘मराठी सुरक्षा’ की काँग्रेससारखीच ‘स्व’सुरक्षा..?
- अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
राज आणि उद्धव ठाकरेमराठी भाषेच्या निमित्ताने जरी एकत्र आले, तरी त्या दोघांच्या एकत्र येण्यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण तयार झाले. त्याच कार्यक्रमात उद्धव यांनी एकत्र राहण्यासाठी एकत्र आल्याचे सांगून टाकले. आता दोन्ही ठाकरेंना या वातावरणाच्या कोशातून सहजासहजी दूर जाता येणार नाही. मुंबई, ठाणे आणि नऊ महानगरपालिका क्षेत्रांत दोन्ही ठाकरेंचे कार्यकर्ते, पदाधिकारी मनाने एकत्र झाले आहेत, पण राज ठाकरे यांनी स्वतःची राजकीय भूमिका अजूनही जाहीर केली नाही. बऱ्याचदा मुख्य नेत्यांना काही गोष्टी बोलणे अडचणीचे वाटत असते, तेव्हा ते आपल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना काही गोष्टी मुद्दाम बोलायला लावतात. त्याचे काय पडसाद उमटतात ते बघतात. त्यानुसार, राजकीय भूमिकांचा मार्ग बनविण्याचे प्रयत्नही होतात. दोन ठाकरे एकत्र येण्याला आता काही दिवसच झाले आहेत. मात्र, असे मुद्दाम बोलायला लावण्याचे प्रकार फार होताना दिसत नाहीत. राज ठाकरे यांनी तर, ‘उद्धव ठाकरे शिवसेनेविषयी कोणीही आपल्याशी चर्चा केल्याशिवाय माध्यमांना काहीही बोलायचे नाही’, अशी ताकीद दिली आहे. त्यामुळे मनसेच्या पातळीवर पूर्णपणे सामसूम आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पातळीवरची अस्वस्थता खा. संजय राऊत यांच्या लिखाणातून स्पष्टपणे समोर आली आहे. किंबहुना त्यांनी स्वतःच दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याविषयी भाष्य करून समोरून काय प्रतिक्रिया येते हे बघण्याचा प्रयत्न केला असावा. राऊत यांच्या लिखाणाने उबाठामधील अस्वस्थतेला तोंड फोडण्याचे काम केले आहे. “शिंदे, फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी जातात... राज ठाकरे त्यांचे स्वागत करतात...” असे लिहिताना संजय राऊत यांनी, “आता स्वतः राज ठाकरे एक दिवस स्वतः समोर येऊन या सगळ्यावर बोलतील आणि संभ्रम दूर करतील हे नक्की...” अशी राज यांना चुचकारणारी भाषा वापरली आहे. “ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील मराठी एकजूट टिकली नाही तर काय होईल या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आहे”, असे म्हणत राऊत यांनी, आम्ही एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. त्याला तुम्ही साथ दिली नाही तर मराठी माणसाच्या होणाऱ्या नुकसानीला तुम्ही तेवढेच जबाबदार असाल, असा गर्भित इशाराही त्या लिखाणातून आहे. मात्र, संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देतील तर ते राज ठाकरे कसले..?
उद्धव आणि राज एकत्र असताना एकनाथ शिंदे यांचे तेव्हाचे शिवसेनेतील स्थान काय होते हे त्या दोघांना माहिती आहे. आनंद दिघे यांच्यासोबत येणारे शिंदे अशी ओळख पुसून टाकत आता त्या स्थानाच्या पलीकडे शिंदे गेलेले आहेत. राज आणि उद्धव यांचे एकमत असो किंवा नसो, पण याच शिंदे यांनी बाळासाहेबांच्या पक्षाचे नाव आणि बाळासाहेबांचे चिन्ह स्वतःकडे घेतले यावरून दोघांमध्येही नाराजीची तीव्रता समान आहे. त्यामुळेच दोन ठाकरेंचे एकत्र येणे वेगळ्या दिशेला जाणारे आहे, पण त्यासाठी लेखांमधून प्रतिक्रियांमधून संवाद साधण्यापेक्षा दोन ठाकरेंनी थेट एकमेकांशी संवाद वाढवला तर त्या तीव्रतेला टोक मिळू शकते. दोन ठाकरेंच्या “मराठी सुरक्षा” भूमिकेमागचे हे खरे कथानक आहे.
तिकडे काँग्रेसचे वेगळेच सुरू आहे. जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेस ठामपणे विरोध करेल, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. त्याच्या दोनच दिवसांनी महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसकडून कसलाही विरोध न झाल्याने हे विधेयक सरकारने एकमताने मंजूर केले. सपकाळ यांनी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांना, कोणते मुद्दे मांडायचे याचे सविस्तर टिपण दिले होते. सभागृहात हा विषय चर्चेला आला, पण वडेट्टीवारच आले नाहीत. प्रत्येक सदस्याला काँग्रेसने यासंबंधीचे मुद्दे दिले. मात्र, एकाही सदस्याने याविषयी ब्र शब्द काढला नाही. आपल्या पक्षाचे कोणीच काही बोलत नाही, हे लक्षात आल्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांना फोन करून याविषयी तुम्ही ठाम भूमिका घ्या, असे सांगितल्याचे समजते. मात्र, बंटी पाटील यांनी भाषण न करता नागपूरचे अभिजित वंजारी यांना बोलण्याची संधी दिली. विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही सभागृहात मिळून काँग्रेसचे २४ सदस्य आहेत. त्यापैकी एकमेव वंजारी या विषयावर बोलले. आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिल्लीत घेतलेल्या जाहीर भूमिकेविरुद्ध जाऊन त्यांनाच तोंडावर पाडण्याचे काम महाराष्ट्र विधानसभेत, त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे विधेयक मंजूर झाल्यानंतर माध्यमांकडे येऊन विधेयकाच्या विरोधात भूमिका मांडली. त्यावेळी त्यांच्या शेजारी अंबादास दानवे, बंटी पाटीलही दिसत होते. मात्र, तेथेही बंटी पाटील यांनी एक शब्द न बोलता निघून जाणे पसंत केले. जनसुरक्षा विधेयकाला विरोध न करण्यामागे स्वसुरक्षा होती की स्वतःच्या पदाची सुरक्षा होती काय याचीच चर्चा आता काँग्रेसमध्ये रंगली आहे.
मीरा-भाईंदरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठी मराठी संघर्ष वाढला आहे. हाणामाऱ्या झाल्या. मोर्चे निघाले. पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली झाली. व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मनसेने मराठी लोकांचा मोर्चा काढला. माजी खासदार राजन विचारे, माजी आ. नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे हातात हात घालून लोकांसमोर गेले. मंत्री प्रताप सरनाईक यांना लोकांनी मोर्चात सहभागी होऊ दिले नाही. त्यात मनसे आणि उद्धवसेनेला सहानुभूती मिळाली. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन मीरा रोडचे रहिवासी आहेत. मात्र, ते मोर्चाकडे फिरकलेही नाहीत. मराठी माणसांमध्ये स्थान निर्माण करण्याची आयती संधी काँग्रेसने गमावली. आता मंगळवारी, उद्या “आम्ही मराठी, आम्ही भारतीय” या नावाने काँग्रेसने मीरा-भाईंदरला कार्यशाळा ठेवली आहे. काँग्रेसला सगळ्याच गोष्टीत उशिरा का शहाणपण येत असावे..?