Marathi Bhasha Din: बहारिनमध्ये बहरली माय मराठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 14:28 IST2018-02-27T14:23:19+5:302018-02-27T14:28:24+5:30
बहारिनच्या १७ लाख लोकसंख्येत पाच हजार मराठी भाषक आहेत. त्यामुळे 'सलाम वालेकुम' सोबत नमस्कार साहेब, तोडलंस मित्रा, बस्स काय भावा असे खास उद्गारही ऐकू येतात.

Marathi Bhasha Din: बहारिनमध्ये बहरली माय मराठी
- अजेय गोगटे
बहारिन... मध्य पूर्व प्रांतातील हा एक लहानसा देश... मुंबई शहराइतकंच क्षेत्रफळ असणारं एक बेट... सौदी अरेबिया या कट्टर देशाला लागून असूनही, या अरबी देशाला मराठी बोलीचा, मराठी संस्कृतीचा वारसा लाभला आहे. त्याचं संपूर्ण श्रेय बहारिनमधील महाराष्ट्र कल्चरल सोसायटीला जातं. कारण, महाराष्ट्रीय लोकांना एकत्र आणून मराठी भाषा आणि परंपरा जोपासण्याचा प्रयत्न ते नेटाने करत आहेत आणि त्यासाठी त्यांना पैकीच्या पैकी मार्क द्यावेच लागतील.
मराठी नववर्ष, अर्थातच गुढीपाडवा या सणापासून ते होळीपर्यंतचे सगळे सण आणि उत्सव बहारिनमध्ये उत्साहाने साजरे केले जातात. या प्रत्येक सोहळ्याचं अत्यंत नेटकं आयोजन केलं जातं. त्यामुळे महाराष्ट्रापासून, घरापासून दूर असल्याची कधीच जाणीव होत नाही. सगळे मराठीजन, आबालवृद्ध या सण-उत्सवांमध्ये अगदी हिरीरीने सहभागी होतात. इंडियन क्लब, तसंच इतर बऱ्याच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही मराठी अस्मितेचं दर्शन घडतं. सलाम बहारिन नावाच्या वार्षिक अंकात मराठी लेख, कविता, वर्षभरात झालेल्या कार्यक्रमांचा आढावा, मराठी पाककृती यांचा समावेश असतो. त्यामुळे लिखाणाची आणि वाचनाची आवड असलेल्या मंडळींसाठी ही साहित्यिक मेजवानीच ठरते.
बहारिनच्या १७ लाख लोकसंख्येत पाच हजार मराठी भाषक आहेत. त्यामुळे शॉपिंग मॉल किंवा उद्यानांमध्ये मराठी भाषा कानावर पडते, ओळख होते, मैत्री वाढत जाते. 'सलाम वालेकुम' सोबत नमस्कार साहेब, तोडलंस मित्रा, बस्स काय भावा असे खास उद्गारही ऐकू येतात. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, नाशिक, नागपूर, कोकण आणि महाराष्ट्राबाहेरही बऱ्याच शहरांमध्ये मराठी बोलली जाते. त्याचा लहेजा वेगवेगळा असला, तरी भावना आपुलकीचीच असते. तशीच बहारिनी मराठीही मराठी माणसांना जोडतेय, बांधून ठेवतेय.
(लेखक गेली दोन वर्षं बहारिनमध्ये वास्तव्यास असून व्यवसायाने शेफ आहे.)