मराठे हे कुणबीपेक्षा वेगळे नाहीत, १८८५ च्या साताऱ्याच्या राजपत्रात नोंद

By हणमंत पाटील | Updated: September 3, 2025 14:17 IST2025-09-03T14:17:34+5:302025-09-03T14:17:51+5:30

१८८१ च्या जनगणनेत ५ लाख ८३ हजार कुणबी

Marathas are no different from Kunbis, recorded in the Satara Gazette of 1885 | मराठे हे कुणबीपेक्षा वेगळे नाहीत, १८८५ च्या साताऱ्याच्या राजपत्रात नोंद

मराठे हे कुणबीपेक्षा वेगळे नाहीत, १८८५ च्या साताऱ्याच्या राजपत्रात नोंद

हणमंत पाटील

सातारा : १८८५ च्या शासकीय राजपत्रात (गॅझेट) सातारा जिल्ह्यातील मराठे हे कुणबीपेक्षा वेगळे नसल्याची नोंद आहे. दोन्हींची वंश परंपरा एकच आहे. त्यांच्या विवाह पद्धती, धार्मिक कार्यक्रम व राजवंशीय आडनावे एकच आहेत. ‘शेती’ हा प्रमुख व्यवसाय असल्याने मराठे बहुधा कुणबींपेक्षा काही वेगळे नसतात, अशी नोंद शासकीय राजपत्रात आढळते.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचे मुंबईतील आंदोलन सातारा व औंध गॅझेटमधील नोंदीची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनानंतर मंगळवारी मागे घेण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर १८८५ च्या मुंबई गॅझेटमध्ये सातारा जिल्ह्यातील कुणबी व मराठा नोंदी सापडतात. शासकीय राजपत्रातील ‘चॅप्टर ३’मधील पान क्रमांक ७५ मध्ये सातारा जिल्ह्यातील मराठा व कुणबी एकच असल्याच्या नोंदीचा उल्लेख आहे. शिवाय सांगलीचा समावेश असलेल्या जुन्या सातारा जिल्ह्याची १८८१ साली शासकीय जनगणना झाली. त्यामध्ये जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ६ लाख ८ हजारची नोंद आहे.

मराठा व कुणबी वेगळी गणना नाही..

जिल्ह्यात सर्वत्र आढळणारे मराठा लोक कुणबी म्हणून ओळखले जातात. १८८१ जनगणनेनुसार त्यांची नोंद कुणबी म्हणून केली आहे. त्यामध्ये मराठा व कुणबी यांची जनगणना वेगवेगळी झालेली नाही. त्यांची कुणबी म्हणून एकत्रच जनगणना झाली असून, त्यांच्या लोकसंख्येची नोंद ५ लाख ८३ हजार इतकी आहे. काही मराठा परिवारांमध्ये राजपूत वंशाचा थोडासा प्रभाव असू शकतो; पण हे नेहमीच असते असे नाही. कुणबी आणि मराठा यातील भेद सामाजिक दिसतो. दोघांचा मुख्य व्यवसाय ‘शेती’ असला तरी मराठे सामान्यतः कुणबींपेक्षा स्वत:ला प्रतिष्ठित समजतात. ते शेतीपेक्षा युद्धाला प्राधान्य देताना दिसतात, अशी नोंद आहे.

कुळाची ओळख गाव व व्यवसायानुसार..

जुन्या राजवंशांची आडनावे : जसे-चोलके, कदंब, यदुवंशी, सोलंकी, शिल्हर, यादव ही आडनावे ‘कुणबी किंवा मराठा’ समाजांमध्येही आढळतात. ही आडनावे इतर जातींमध्येही वापरली जातात. त्यामुळे आडनावाचा अर्थ ‘उत्तरी वंश’ होतो, असा अर्थ लावणं अचूक नसते; हे आडनाव फक्त संचलित किंवा मुख्य आडनाव म्हणून ग्रहण केले गेलेले असू शकते. परंतु, गाव व व्यवसायानुसारही आडनावे असू शकतात.

एकच धार्मिक व सांस्कृतिक विधी..

कुणबी आणि मराठा यांच्या जन्मकथांमध्ये फारसा फरक नाही. विवाह विधीदेखील अगदी समान असतात. लग्नाच्या पूर्वी शुभ मुहूर्त पाहणे. लग्नाची धार्मिक परंपरा व रीतीरिवाज दोन्हींमध्ये सारखेच आढळतात.

सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांनी आपल्या राज्यात १८१९ मध्ये जनगणना राबवली. ही जनगणना जातनिहाय होती. कोणत्या जातीचे किती लोक कोणत्या गावात राहतात. त्यांचे व्यवसाय काय, त्यांचे राहणीमान कसे आहे. या सर्व गोष्टींविषयी नोंदी करून त्यानुसार रोजगार व विकास योजना राबविण्यास त्यांनी सुरुवात केली होती. या जनगणनेत शेती करणाऱ्या मराठ्यांच्या गावागावांत कुणबी म्हणून नोंदी आढळतात. ज्यांचा व्यवसाय शेती आहे, परंतु ते मराठा समाजातील आहेत, त्यांची कुणबी म्हणूनच नोंद करण्यात आली. परंतु काही ठिकाणी कुणबींचा मराठा म्हणून सुद्धा उल्लेख आढळतो. मुळात काही सरदार अथवा प्रतिष्ठित मराठा समाजातील लोक हे स्वतःला कुणबी न म्हणवता मराठा म्हणून उल्लेख करत त्यामुळे या नोंदींमध्ये तशी तफावत आढळून येते. हीच पद्धती पुढे ब्रिटिशांनी सुरू ठेवली. सध्या चर्चेत असलेल्या १८८५ च्या गॅझेटमध्ये या नोंदी आढळतात. - नीलेश झोरे, इतिहास अभ्यासक, सातारा.

सातारा गॅझेटिअर मान्य झाल्यास न्याय : ॲड. बाबासाहेब मुळीक

स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यात सध्या सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, खानापूर, तासगाव, कडेगाव, पलूस हे तालुके समाविष्ट होते. १८८५ च्या सातारा गॅझेटिअरमध्ये १८८१ च्या जनगणनेत जिल्ह्याची लोकसंख्या १० लाख होती. त्यापैकी कुणबी समाजाची लोकसंख्या ५ लाख ८३ हजार इतकी नोंदली आहे. त्या वेळी मराठा व कुणबी समाजाची स्वतंत्र जनगणना झालेली नव्हती. "सातारा गॅझेटिअर मराठे व कुणबी एकच असल्याचा उल्लेख आहे. या सातारा गॅझेटिअरची अंमलबजावणी झाल्यास सांगली जिल्ह्यातील या सहा तालुक्यांतील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा होईल,” अशी प्रतिक्रिया विधिज्ञ ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी दिली.

Web Title: Marathas are no different from Kunbis, recorded in the Satara Gazette of 1885

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.