छगन भुजबळांचा राजीनामा अन् ओबीसींसाठी प्रकाश शेंडगेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 11:26 AM2024-02-06T11:26:42+5:302024-02-06T11:28:48+5:30

महाराष्ट्राची सत्ता मागासवर्गीयाच्या हाती देऊ. गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढूया असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं.

Maratha vs OBC: Chhagan Bhujbal's resignation and Prakash Shendage launched a new political party for the OBC community | छगन भुजबळांचा राजीनामा अन् ओबीसींसाठी प्रकाश शेंडगेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा

छगन भुजबळांचा राजीनामा अन् ओबीसींसाठी प्रकाश शेंडगेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा

मुंबई - OBC new political party ( Marathi News ) महाराष्ट्रात ओबीसीच्या आरक्षणाचे तीन तेरा होताना उभ्या देशाने पाहिले आहे. या आरक्षणाच्या लढाईत मराठा समाज सत्तेच्या माध्यमातून ताकदीच्या जोरावर दंडुकेशाहीवर ओबीसी समाजाच्या मुलांचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहे. त्यातून उद्विग्न होऊन ओबीसी समाजाने सत्ता उलथवण्यासाठी ओबीसी, भटक्या विमुक्तांचे राज्य आणायचं ठरलेला आहे. त्यासाठी ओबीसींसाठी एक स्वतंत्र पक्ष राज्यात स्थापन करण्याचा ठराव ओबीसींच्या बैठकीत समंत करण्यात आला. येणाऱ्या सर्व निवडणुकीत लोकसभा, विधानसभा ताकदीने ओबीसी समाज गावागावात लढतील. कुठल्याही परिस्थितीत प्रस्थापितांविरुद्धची ही लढाई आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. 

मुंबईत ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीनंतर प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं की, राज्यात भटके विमुक्त आणि ओबीसींची संख्या ६०-६५ टक्क्यांच्या आसपास आहे. तरीही भटक्या विमुक्त समाजाच्या आमदारांना पाडण्यात येत होते. मराठा खासदार, आमदार सर्वाधिक आहेत. घटनेने दिलेल्या अधिकारातही आम्हाला वाटा घेऊ दिला नाही. त्यामुळे आम्ही सत्तेपासून वंचित राहिलो. म्हणून आम्हाला पक्ष स्थापन केल्याशिवाय पर्याय नव्हता. १५ जणांची समिती नेमली आहे. पक्षाचे नाव, घटना याबाबत अभ्यास करणार आहे. ही लढाई लढण्याची आमची इच्छा नव्हती. परंतु ७५ वर्ष आमच्या वाट्याला जे आले त्यामुळे आम्ही रणशिंग फुंकले आहे. आमच्याकडे पैसा, साधने नाहीत पण लोकशक्ती आहे. आमच्या पक्षाकडे ६० टक्के मतदार आहेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच सत्तेत भटक्या विमुक्तांचा, दलितांचा वाटा असावा यासाठी प्रकाश आंबेडकर यांनीही साथ द्यावी. महाराष्ट्राची सत्ता मागासवर्गीयाच्या हाती देऊ. गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढूया. गेल्या २ महिन्यापासून ओबीसींवर दबाव आहे. पक्ष काढायला हवा असं अनेक मागणी करत होते. पण ते शक्य नव्हते. मात्र आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांकडून दबाव वाढत चालल्याने अखेर पक्ष काढणं आम्हाला भाग पडलं आहे. व्होट बँक ही आमची जास्त आहे. आता सगळ्या लढाई ओबीसी भटके विमुक्त आणि दलितांची आहे. सत्ता ओबीसी, दलितांच्या हाती असेल असंही प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, भुजबळ हे मोठ्या पक्षाचे नेते आहेत. जेव्हा छगन भुजबळ यांना वाटेल तेव्हा ते आमच्या पक्षात येतील आणि ते आमच्या पक्षाचे नेते असतील. मात्र आमच्या या लढाईला भुजबळांचा नक्कीच पाठिंबा असेल. गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळांची कोंडी होतेय हे दिसून येते. मागासवर्गीय आयोगाने केलेल्या सर्व्हेक्षणाला ओबीसी संघटना आव्हान देतील. चुकीची माहिती देऊन बोगस सर्व्हेक्षण केले आहे. आधार कार्ड लिंक असल्याने हे सर्व बाहेर येणार आहे. सध्या आमच्या पक्षाच्या २-३ नावांवर चर्चा आहे. त्यात ओबीसी बहुजन जनमोर्चा असं एक नाव आहे. मात्र समिती आणखी नावावर चर्चा करेल आणि   त्यानंतर पक्षाची नोंदणीसह इतर प्रक्रिया पार पडेल असंही प्रकाश शेंडगे यांनी सांगितले आहे. 

मंत्री छगन भुजबळांचा राजीनामा

मागील काही महिन्यांपासून मंत्री छगन भुजबळ सातत्याने आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणातील समावेशाला विरोध करत आहेत. त्यामुळे विरोधकांसह सरकारमधील मराठा समाजाचे नेते, आमदार भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी करतायेत. त्यावर अहमदनगरच्या सभेत भुजबळांनी मी १६ नोव्हेंबरलाच राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ओबीसी समाजाचा पहिला एल्गार मेळावा जालनाच्या अंबड येथे घेण्यात आला. या सभेला जाण्यापूर्वीच मी माझा राजीनामा सादर केला आणि त्यानंतर सभेला गेलो असं त्यांनी म्हटलं. मात्र अद्याप हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नसल्याचं बोलले जात आहे. त्यातच आता ओबीसी नेत्यांनी स्वत:चा राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली. यावर भुजबळ काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे गरजेचे आहे. 

Web Title: Maratha vs OBC: Chhagan Bhujbal's resignation and Prakash Shendage launched a new political party for the OBC community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.