Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 07:02 IST2025-08-28T07:01:42+5:302025-08-28T07:02:46+5:30
Manoj Jarange Patil Mumbai Protest: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे बुधवारी सकाळी १०:३० वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले. जरांगे यांच्या हाकेला प्रतिसाद देत हजारो वाहने घेऊन लाखोंचा जनसमुदायही मुंबईकडे निघाला आहे. त

Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
वडीगोद्री (जि. जालना)/मुंबई - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे बुधवारी सकाळी १०:३० वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले. जरांगे यांच्या हाकेला प्रतिसाद देत हजारो वाहने घेऊन लाखोंचा जनसमुदायही मुंबईकडे निघाला आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी जरांगे-पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला सशर्त परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी केवळ एकाच दिवसासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मर्यादित असणार आहे. त्यावर जरांगे-पाटील यांनीही मुंबई पोलिसांना हमीपत्र सादर केले आहे.
मनोज जरांगेंनी हमीपत्रात काय म्हटले?
आंदोलन सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेतच करणार. वाहनतळ आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यात येईल. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवणार. सहभागी होणाऱ्या व्यक्ती लाठ्या, अग्निशस्त्रे, भाले, तलवारी आणि इतर वस्तू जवळ बाळगणार नाहीत. ध्वजांसाठी/फलकांसाठी दोन फुटांपेक्षा अधिक लांबीची काठी वापरणार नाही. ध्वजाचा/फलकाचा आकार १ फूट, ६ फूट किंवा त्यापेक्षा कमी असेल. सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती, चिथावणीखोर भाषणे करणार नाही.
मुंबई पोलिसांनी घातलेल्या अटी कोणत्या?
केवळ एकाच दिवसासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलनाला परवानगी असेल. केवळ ५ हजार आंदोलकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी; जरांगे यांच्यासोबत असलेल्या केवळ पाच वाहनांनाच आझाद मैदानापर्यंत प्रवेश, इतर वाहनांना वाडीबंदर जंक्शनपर्यंतच प्रवेश.
आंदोलनाच्या मार्गासाठी आधीच आखून दिलेला रस्ता वापरणे बंधनकारक, पूर्वपरवानगीशिवाय ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; आझाद मैदानात अन्न शिजवण्यास सक्त मनाई, मैदानाची स्वच्छता राखण्याची जबाबदारी देखील आंदोलकांचीच असेल.
महामार्गावर वाहतूक कोंडी : मराठा आरक्षणासाठी हजारो वाहने घेऊन समाज बांधव बुधवारी अंतरवाली सराटी, पैठण फाट्यावर जमा झाले होते. यामुळे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.