भाषण करता करता अचानक मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळली; हॉस्पिटलमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 08:32 IST2023-12-12T08:32:12+5:302023-12-12T08:32:42+5:30
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले

भाषण करता करता अचानक मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळली; हॉस्पिटलमध्ये दाखल
बीड - मराठा आरक्षणासाठी गेल्या २ महिन्यापासून रान उठवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी धाराशिव इथं जाहीर सभेत जरांगे पाटील बोलत होते. मात्र भाषण करता करता अचानक ते खाली बसले त्यामुळे गोंधळ उडाला. सततचा प्रवास, जाहीर सभा यातून आलेल्या थकवा यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याचे बोलले जाते.
जरांगे पाटील यांच्यावर वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे. अशक्तपणा आलाय. सातत्याने तणाव घेऊन प्रवास करणे यातून त्यांचे तब्येतीकडे दुर्लक्ष होत आहे. सुगर प्रमाण सातत्याने कमी होत गेली तर त्याचा परिणाम किडनीवर होऊ शकतो. मनोज जरांगे पाटील यांनी ५-६ दिवस आराम केला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आहे. धाराशिव येथील दुपारच्या रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होती. या सभेवेळी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने भाषण करतानाच अचानक जरांगे पाटील खाली बसले आणि बसूनच सभेला संबोधित केले.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत. सध्या जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर असली तरी अशक्तपणा आणि थकवा जास्त आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी विश्रांती घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. भरसभेत प्रकृती खालावली तरी जरांगे पाटील यांनी व्यासपीठ सोडले नाही. उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करत समाजाला जागरुक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर सभा आटोपून जाताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं बीडच्या अंबेजोगाई येथील थोरात रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.
३ महिने आराम करण्याचा सल्ला
जरांगे पाटील यांना अशक्तपणा आला असून त्यांची रक्त तपासणी करण्यात येणार आहे. सध्या त्यांना सलाईन लावली असून वेळेवर जेवण नाही, उन्हात रॅली, सततचा प्रवास यामुळे त्यांना थकवा आल्याचे डॉक्टर म्हणाले. कमीत कमी ३ महिने जरांगे पाटील यांनी आराम केला पाहिजे असा सल्ला त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संदीप थोरात यांनी दिला आहे.