Maratha Reservation: "माणसं जगली, तर आरक्षणासाठी लढा देता येईल; २७ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 05:32 IST2021-05-21T05:31:59+5:302021-05-21T05:32:32+5:30
खासदार संभाजीराजे; मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीपूर्वी राज्यव्यापी दौरा

Maratha Reservation: "माणसं जगली, तर आरक्षणासाठी लढा देता येईल; २७ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार"
नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत समाजाच्या तज्ज्ञ लोकांशी संवाद साधणार आहे. त्यासाठीच नाशिकसह सोलापूर, कोल्हापूर, नांदेडसह महाराष्ट्रातील समाज प्रतिनिधींच्या भावना जाणून घेतल्यानंतर २७ मे रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून, त्यानंतर त्याचदिवशी पत्रकार परिषद घेऊन समाजाची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
कोरोना संकटात कुटुंबीयांना गमावलेल्या कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्यासोबतच मराठा समाजातील प्रतिनिधींसोबत चर्चा करून आरक्षणाविषयी मत जाणून घेण्यासाठी संभाजीराजे दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोरोनाच्या संकटात राज्यासाठी पुढील सहा-सात दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपण संयमाची भूमिका घेतली असून, माणसं जगली, तर आरक्षणासाठी लढा देता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आक्रमक होण्याची ही वेळ नाही
माझ्या संयमाच्या भूमिकेविषयीही काहीजणांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे. परंतु, ही आक्रमक होण्याची वेळ नाही. माणसं जगली, तर आरक्षणासाठी लढा देता येईल, असे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले. सत्ताधारी व विरोधातील नेते एक-दुसऱ्याविरोधात आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यांच्याशी मराठा समाजाला काहीच घेणे-देणे नाही. आरक्षणाविषयी मार्ग काय काढणार आहात, ते सांगा, असे आवाहनही त्यांनी या नेत्यांना केले. पंतप्रधानांना चारवेळा पत्र लिहूनही त्यांची वेळ मिळाली नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.