अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 10:10 IST2025-08-27T09:56:45+5:302025-08-27T10:10:40+5:30
Maratha Reservation: न्यायदेवता आमचे म्हणणे ऐकून आम्हाला न्याय देईल, असे म्हणत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाणार असल्याचे सूचित केले आहे. अंतरवाली सराटी येथून बुधवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मनोज जरांगे यांच्यासह समाजबांधव मुंबईकडे निघणार आहेत.

अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
वडीगोद्री (जालना) - न्यायदेवता आमचे म्हणणे ऐकून आम्हाला न्याय देईल, असे म्हणत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाणार असल्याचे सूचित केले आहे. अंतरवाली सराटी येथून बुधवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मनोज जरांगे यांच्यासह समाजबांधव मुंबईकडे निघणार आहेत.
मराठा आणि कुणबी एकच असून, समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनास २७ ऑगस्टला २ वर्षे होत आहेत. मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुंबईला २७ ऑगस्ट रोजी जाण्याची घोषणा चार महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आमदारांशीही बोलणे झाले होते. परंतु, मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
अशी झाली उपोषणे
जरांगे पाटील यांचे पहिले उपोषण २९ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ यादरम्यान झाले. १ सप्टेंबरला लाठी हल्ला झाला होता. दुसरे उपोषण २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत केले. २० जानेवारी २०२४ रोजी जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले. २६ जानेवारीला सगेसोयरे अध्यादेशाची प्रत दिल्यावर अंतरवालीत पोहोचले. तिसरे उपोषण १० फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केले. २० फेब्रुवारीस १० टक्के आरक्षण मंजूर. २५ फेब्रुवारीस ते पुन्हा मुंबईकडे निघाले. त्यांना भांबरी गावात रोखले. २६ ला उपोषण मागे. चौथे उपोषण दि. ८ जून २०२४ रोजी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सुरू केले. १३ जून रोजी ते उपोषण मागे घेतले. पाचवे उपोषण २० जुलै २०२४ रोजी सुरू करण्यात आले. २४ जुलैला उपोषण मागे घेतले. सहावे उपोषण १७ सप्टेंबरला सुरू केले. २५ सप्टेंबरला उपोषण मागे घेतले. सातवे उपोषण २५ जानेवारीला सुरू करून ३० जानेवारीला मागे घेतले.
न्यायमूर्ती शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत धडक देणार असताना मराठा -कुणबी, कुणबी - मराठा नोंदी शोधण्यासाठी गठित केलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झाला. राज्य सरकारने यापूर्वी शिंदे समितीला ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत दिली होती.
जरांगे यांच्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार
पडली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना विखे-पाटील म्हणाले, हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटमधील नोंदीनुसार ओबीसी प्रमाणपत्र मिळावे, अशी जरांगे यांची मागणी आहे. याबाबत उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली.
मोर्चा मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त
अहिल्यानगर : अंतरवाली सराटी येथून मोर्चा निघणार असून, अहिल्यानगरमार्गे शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अहिल्यानगर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.
माेर्चा मार्गावर ८०० पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. तसेच २३ वाहनांचाही ताफा मोर्चात राहणार आहे. समाजबांधवांसह वाहनांतून जरांगे पाटील अहिल्यानगरमार्गे शिवनेरी किल्ल्यावर मुक्कामी जाणार आहेत. तेथून मुंबईकडे प्रस्थान करतील.
‘जरांगे यांची भाषा खपवून घेणार नाही’
मुंबई : महायुती सरकार तीन कोटी १७ लाख मते व ५१.७८ टक्के मताधिक्याने निवडून आले आहे. अशा मजबूत सरकारला उलथवण्याची भाषा चीड आणणारी आहे, असे सांगत महाराष्ट्र वैयक्तिक टीका कदापि सहन करणार नाही, खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील
यांना ठणकावले.
ते माध्यमाशी बोलत होते. मराठा आरक्षणासह कोणत्याही मागण्यांसाठी संयम आणि सकारात्मक चर्चेचा मार्ग अवलंबावा. आम्ही सर्वांचे हक्क मांडण्यास मोकळीक देतो, पण अशा भाषा आणि धमक्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाहीत.
चिथावणीखोर आणि अर्वाच्य भाषा टाळली पाहिजे, आंदोलन व मागण्या मांडण्याचा सर्वांना हक्क आहे, पण एकेरी भाषा वापरणे, नेत्यांच्या कुटुंबियांबाबत बोलणे सहन करणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.