मनोज जरांगे पाटलांनी घेतली बीड पोलीस अधीक्षकांची भेट; बैठकीत काय झाली चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 15:59 IST2023-11-15T15:59:19+5:302023-11-15T15:59:54+5:30
पोलिसांकडून विनाकारण त्रास होतोय, मराठा आरक्षणाची वेदना मांडली म्हणून त्यांना त्रास दिला जातोय असा आरोप जरांगे पाटलांनी केला.

मनोज जरांगे पाटलांनी घेतली बीड पोलीस अधीक्षकांची भेट; बैठकीत काय झाली चर्चा?
बीड – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याठिकाणी लोकप्रतिनिधींच्या घरावर आणि कार्यालयावर आंदोलकांनी जाळपोळ केली होती. या घटनेचे पडसाद जिल्ह्यात सर्वत्र उमटले. बीडमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे.
या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमचे काही निष्पाप बांधव जे साखळी उपोषण करतायेत. जे हिंसाचारात सहभागी नाही त्यांच्यावरही सरसकट गुन्हे दाखल केले जात आहेत. याबाबत अधिकाऱ्यांची चर्चा केली. जे हिंसक आंदोलनात सहभागी आहेत त्यांच्याबाबत आमचं काही म्हणणं नाही. परंतु ज्यांचा सहभाग नाही त्यांना विनाकारण त्रास का दिला जातोय? २-३ हजारांची यादी बनवली आहे. गोरगरीब मराठा पोरांवर गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देऊ नये अशी मागणी आम्ही आजच्या चर्चेत केली आहे.
तसेच पोलिसांकडून विनाकारण त्रास होतोय, मराठा आरक्षणाची वेदना मांडली म्हणून त्यांना त्रास दिला जातोय. मराठा समाजाच्या मुलांवर अन्याय करू नका. ओबीसी नेत्यांच्या दबावापुढे असे घडणार नाही. विनाकारण इतके नावे पोलीस घेणार नाहीत. कुणीतरी नावे दिली असणार आहेत. पण पोलीस काय सांगणार नाहीत. एकाने रस्ता रोको केला आणि पाठीमागे जो उभा राहिलाय त्याच्यावरही ३०७ गुन्हा लावला जातोय. जे हिंसक आंदोलनात सहभागी नाहीत त्यांना का उचलून अत्याचार करताय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांना विचारला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली, निरपाराधांना त्रास देऊ नये अशी मागणी केली. तपासात असे काही घडणार नाही अशी काळजी आम्ही घेतोय. ज्यांच्याविरोधात पुरावे आणि साक्षीदार आहेत त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत हिंसक आंदोलनात १८० हून अधिक लोकांना अटक केली आहे. मोठ्या प्रमाणात जमाव असल्याने आरोपींची ओळख पटवणे सुरू आहे. आतापर्यंत ४०० लोकांची ओळख पटली आहे. जसजसे ओळख पटतेय तशी पुढची कार्यवाही सुरू आहे. तपासात ज्या गोष्टी समोर येतील त्यानुसार कारवाई सुरू राहील असं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी म्हटलं आहे.