"हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीये"; मनोज जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:52 IST2024-12-25T13:50:58+5:302024-12-25T13:52:18+5:30

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे यांनी पुन्हा जोर दिला आहे. जरांगेंनी परभणीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केले. त्यावर फडणवीसांनी भाष्य केले. 

maratha Reservation is not a question of fun; Chief Minister Devendra Fadnavis responded to Manoj Jarange's statement | "हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीये"; मनोज जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर 

"हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीये"; मनोज जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर 

Devendra Fadnavis Manoj Jarange Maratha Reservation: मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून सरकारला घेरताना दिसत आहे. परभणीत बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. जरांगे यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. 

परभणी जिल्ह्यातील दामपुरी गावात मनोज जरांगे मुक्कामी थांबले होते. गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी बोलताना जरांगेंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला. 25 जानेवारीपासून मी पुन्हा उपोषण सुरू करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

"काही लोक म्हणतात की, आता पहिले सरकार आहे, आरक्षण देतील का? पण आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची... होऊ द्या आता... पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना. मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो. आता कळेल देतो की नाही ते", असे विधान मनोज जरांगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता केलं.   

देवेंद्र फडणवीस यांनी काय दिले उत्तर?

"पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे. यावर मजा काय आली पाहिजे? हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसांपासून मी असेन, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील. आमच्या भूमिकेत कुठलेच अंतर नाहीये. आमच्यामध्ये कुठला अंतर्विरोध नाहीये. जे निर्णय घेतले आहेत, तिघांनी मिळून घेतले आहेत. पुढेही जे निर्णय घेऊ, तिघे मिळून घेऊ", असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांनी केलेल्या विधानावर बोलताना दिले. 

मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटल्यावर जरांगेंचा पुढचा प्लॅन काय?

"मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर, मुस्लीम आरक्षण कसे देत नाहीत, हे बघतोच. २५ जानेवारीपासून उपोषण सुरू करणार आहे. मी राहो न राहो पण आरक्षणासाठी लढा देणार आहे", असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे. 

२५ जानेवारी २०२५ पासून आम्ही आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहोत. २५ जानेवारीच्या आत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल. २५ जानेवारी रोजी राज्यभरातील मराठ्यांनी आंतरवलीकडे यायचं. त्यादिवशी कोणीही लग्नाची तारीख काढू नका, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले आहे.

Web Title: maratha Reservation is not a question of fun; Chief Minister Devendra Fadnavis responded to Manoj Jarange's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.