Maratha Reservation: नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी
By नामदेव मोरे | Updated: September 1, 2025 11:01 IST2025-09-01T11:00:32+5:302025-09-01T11:01:42+5:30
आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये तरुणांसोबत साठी, सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.

Maratha Reservation: नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी
नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये तरुणांसोबत साठी, सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने ज्येष्ठ आंदोलक लढ्यात सहभागी झाली आहेत. शेतात कष्ट करण्यात आयुष्य गेले, भावी पिढ्यांचे भवितव्य चांगले व्हावे, यासाठी लढत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.
आमचे वाडवडील शेतात राबले, आम्हीही राबलो, मुलेही राबत आहेत. नातवंडे शिकली, पदवीधर झाली; पण नोकऱ्या मिळेना. विद्वत्ता असूनही नोकरी नाही, यामुळे पुन्हा ढेकळं फोडणंच नशिबी आले आहे. आता तरी न्याय मिळावा, अशा प्रतिक्रिया आंदोलक ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.
‘आरक्षणाला गणराया पावावा
घरात गणेशोत्सव सुरू आहे; सण-उत्सवाच्या काळात आम्ही मुंबईत आलो आहे. आरक्षणाला गणराया पावावा, ही अपेक्षा आहे. कितीही पाऊस पडला, संकटे आली तरी आम्ही माघारी फिरणार नाही, असा निर्धार ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे.
निकराच्या लढ्यासाठी मुंबईत झाले दाखल
जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बीडसह मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यांतून शेकडो ज्येष्ठ नागरिक आरक्षणाच्या निकराच्या लढ्यासाठी मुंबई, नवी मुंबईत दाखल झाले आहेत.
गावी ‘एक गाव एक गणपती’ असतो. घरात गौराईही आली आहे. घरी सण असला तरी भावी पिढीच्या भवितव्यासाठी आम्ही आंदोलनात सहभागी झालो आहोत.
बाळासाहेब कदम, ज्येष्ठ नागरिक, माजलगाव-बीड
आरक्षणामुळे भावी पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित होईल. यामुळे आंदोलनात सहभागी झालो आहोत. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत गावी जाणार नाही.
देवीदास सवंडकर (वय ७०), हिंगोली
गावी गणेशोत्सव आहे, गौराई बसविल्याचा फोन आला होता. सण-उत्सव असतानाही लेकरांच्या हितासाठी आंदोलनात आलो आहे.
दिंगबर सवंडकर (वय ६५), टेंभुर्णी, हिंगोली