मराठा मोर्चा २० नोव्हेंबरपासून रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:28 IST2018-10-27T23:34:20+5:302018-10-28T06:28:37+5:30
मराठा समाजाला आरक्षण देऊन दुष्काळासाठी भरीव तरतूद न केल्यास २० नोव्हेंबरपासून राज्यभरातील मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा निर्णय मराठा क्रांती ठोक मोर्चाने शनिवारी जाहीर केला आहे.

मराठा मोर्चा २० नोव्हेंबरपासून रस्त्यावर
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देऊन दुष्काळासाठी भरीव तरतूद न केल्यास २० नोव्हेंबरपासून राज्यभरातील मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा निर्णय मराठा क्रांती ठोक मोर्चाने शनिवारी जाहीर केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाबाबत घोषणा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार सरकारने २० नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा गनिमी काव्याने होणाऱ्या आंदोलनासाठी तयार राहावे, असा इशाराच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या राज्यव्यापी बैठकीनंतर देण्यात आला. मराठा समाजातील सर्व समन्वयकांनी एकत्र येत वज्रमूठ करण्याचे आवाहन उपस्थितांनी केले. २० नोव्हेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन पूर्ण केलेले नाही. मराठा समाजातील तरुणांची धरपकड अद्याप सुरू असून आंदोलन चिरडण्यासाठी नियोजनातील लोकांना विनाकारण रात्री-अपरात्री पोलीस ताब्यात घेत आहेत, असे समन्वयकांनी सांगितले.