मराठा क्रांती मोर्चा : दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 14:32 IST2017-08-08T14:14:29+5:302017-08-08T14:32:23+5:30

मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील सरकारी शाळांसहीत खासगी शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. 

Maratha Kranti Morcha: Holiday to all schools in South Mumbai | मराठा क्रांती मोर्चा : दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी

मराठा क्रांती मोर्चा : दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी

मुंबई, दि. 8 - मुंबईमध्ये बुधवारी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.  मोर्चामुळे शालेय वाहतुकीस यामुळे अडचण निर्माण झाल्यास विद्यार्थी वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची शक्यता आहे, असे सांगत शिक्षण विभागानं बुधवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील सरकारी शाळांसहीत खासगी शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.  

मुंबईत निघणार २५ लाखांचा महामोर्चा, रेकॉर्डब्रेक मोर्चाचा दावा

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे वादळ बुधवारी मुंबईला धडक देणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ लाखांहून अधिक आंदोलक महामोर्चात सामील होतील, असा दावा मुंबई समन्वय समितीने केला आहे. सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत समितीने रेकॉर्डब्रेक मोर्चाचा दावा करत, नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.


समितीचे समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की, महामोर्चा हा मूक स्वरूपाचा असून, मुंबईच्या इतिहासात तो सर्वात मोठा असेल. आतापर्यंत ५७ मूक मोर्चे झाले असून, त्याप्रमाणेच या ५८व्या मोर्चाची आचारसंहिता असेल. सकाळी ११ वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होईल. दरम्यान, कोणत्याही प्रकारची भाषणे आणि घोषणा या वेळी दिल्या जाणार नाहीत. राणीबागहून निघालेला मोर्चा कै. अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित होईल.


मोर्चाच्या तयारीसाठी आवश्यक पालिका, पोलीस, वाहतूक, अग्निशमन दल आणि इतर आवश्यक यंत्रणांच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या मोर्चाला सामाजिक संस्था, गणशोत्सव व दहीहंडी मंडळे, मुंबईचे डब्बेवाले, रेल मराठाचे स्वयंसेवक, मराठा मेडिको असोसिएशन, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड यांसह राजकीय, मुस्लीम आणि दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

चेंबूरपासून वाहतुकीला बगल
मुंबईतील भायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना होतील. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येईल.

अफवांवर विश्वास ठेवू नका
मराठा क्रांती मोर्चा काही कारणांमुळे विस्कळीत व्हावा, या हेतूने अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. गाडीवर स्टीकर नसेल तर मुंबईत प्रवेश मिळणार नाही, ट्रॅफिक जाम आहे, अशा प्रकारचे विविध संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. तरी मराठा बांधवांनी या अफवांला बळी न पडता मुंबई गाठायची आहे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई समितीने केले आहे.

Web Title: Maratha Kranti Morcha: Holiday to all schools in South Mumbai