देशभरातील कलाकारांचे मॅपिंग होणार; ७१३ जिल्ह्यात राबविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 07:00 IST2019-05-29T07:00:00+5:302019-05-29T07:00:02+5:30
आता केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने देशभरातील कलाकार, कलाप्रकार आणि त्यांचे ठिकाण यांचे मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरातील कलाकारांचे मॅपिंग होणार; ७१३ जिल्ह्यात राबविणार
पुणे : शासन स्तरावर कलाकार मंडळींसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या जातात. पण त्या कलाकारांपर्यंत पोहोचतच नाहीत. यासाठी आता केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने देशभरातील कलाकार, कलाप्रकार आणि त्यांचे ठिकाण यांचे मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला असून, याद्वारे देशभरातील ७१३ जिल्ह्यांमधील कलाकारांचा डेटा बेस तयार केला जाणार आहे. ‘कल्चरल मॅपिंग मिशन ऑफ इंडिया’ असे या मिशनचे नाव आहे.
अर्थतज्ञ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे माजी प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी देशभरातील कलाकारांचे मॅपिंग करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाला सादर केला होता. त्याला मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, या मॅपिंगच्या तांत्रिक कामाला सुरूवात झाली आहे. करंजीकर हे या ‘कल्चरल मॅपिंग मिशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष आहेत.
यासंदर्भात दीपक करंजीकर म्हणाले, भारताला कलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. कलेसाठी अनेक कलाकारांनी आयुष्य समर्पित केले आहे. मात्र वयाच्या उतरत्या काळात त्यांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागते. शासनाच्या योजना तळागाळातील कलाकारांपर्यंत न पोहोचणे हे याचे प्रमुख कारण आहे. यासाठीच देशभरातील कलाकारांचे मॅपिंग करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाला सादर केला होता. मँपिंगच्या माध्यमातून कलाकारांची डेमोग्राफी तयार होऊ शकेल. उदा: तो कलाकार कोणत्या भागातला आहे? तो कोणते वाद्य वाजवतो? याचा डेटा संकलित करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात कला ही तीन प्रकारात मोडते. कलात्मक,दृश्यात्मक आणि साहित्य. या तिन्हींचे मिळून 86 उपप्रकार आहेत. देशातल्या ७१३ जिल्हयातल्या कलाकार, कलाप्रकार आणि लोकेशन यांचे मॅपिंग केला जाणार आहे. याद्वारे एक राष्ट्रीय डेटाबेस तयार होऊ शकेल. हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या पसंतीस उतरला. शासनाने याचा सविस्तर तपशील तयार करण्यास सांगितले. त्यानुसार एक मिशन डॉक्यूमेंट तयार केले. या प्रस्तावाची प्रत्यक्षात अमंलबजावणी करायची झाल्यास पोर्टल विकसित करावे लागणार आहे. एका मोबाईल अँपच्या माध्यमातून सर्व गोष्टी एकत्रित करण्याचा विचार आहे. कारण एकाच ठिकाणी बसून कुणीही अनेक फॉर्म भरू शकतो. त्यातून फसवेगिरी होऊ शकते. मोबाईल अॅपमुळे त्याला आळा बसू शकणार आहे. या मॅपिंगच्या तांत्रिक कामाला सुरूवात झाली आहे. याला सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
........
’ देशामध्ये परंपरागत कला जोपासल्या जात आहेत. पद्मश्री ते नवशिकाऊ अशी कलाकारांची एक साखळी आहे. कलाप्रकारांना टिकविले नाही किंवा कलाकारांना व्यवस्थित मदत मिळाली नाही तर देश बकाल होऊ शकतो- दीपक करंजीकर, अध्यक्ष, कल्चरलपिंग मिशन ऑफ इंडिया
मॅपिंगचे फायदे काय?
*कलाकारांचा राष्ट्रीय पातळीवरचा डेटा बेस तयार होईल
* सरकारच्या शिष्यवृत्ती योजना, अनुदान कलाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी एक ओळख तयार होईल.
*मधल्या यंत्रणांची गरज भासणार नाही. पैसे थेट कलाकारांपर्यंत पोहोचतील.