bjp party incoming maharashtra news : लातूर जिल्ह्यातील चाकूर नगरपंचायतीचे माजी अध्यक्ष व प्रहारचे नेते कपील माकणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद पवार गटाचे निळकंठ मिरकले यांच्यासह शरद पवार गट, प्रहारच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष खा. डॉ. अजित गोपछडे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आ. संभाजी पाटील निलंगेकर, अर्चना पाटील चाकुरकर, मराठवाडा विभागीय संघटनमंत्री संजय कोडगे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार गटाचे डॉ. गोविंद माकणे, चाकूर कृ.उ.बा.स. उपसभापती लक्ष्मण दंडिमे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. आपण सर्वजण भाजपाची राष्ट्रीय विचारधारा मजबूत करण्यासाठी तसेच राज्याला विकासात अग्रेसर बनवण्यासाठी झटून काम करूया असे आवाहन केले. या कार्यकर्त्यांनी मांडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसून प्रयत्न करण्यात येतील असेही ते म्हणाले.
प्रवेशावेळी माकणे म्हणाले की, मला नगराध्यक्ष करण्यात भाजपा चा सिंहाचा वाटा होता. त्या नंतरही वेळोवेळी विकासकार्यात भाजपाने सहकार्य दिले. आमदार निलंगेकर म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूरमधील योजनांना नेहमीच पाठबळ दिले. प्रवेश केलेले सर्व कार्यकर्ते पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक नेतृत्वाकडे आशेने पाहत आहेत. प्रवेश केलेले सर्व कार्यकर्ते पक्षाची विचारधारा बळकट करतील असे अर्चना पाटील चाकूरकर यांनी सांगितले.
भाजपा मध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये चाकूर कृ.उ.बा.स. चे संचालक बाबूराव सूर्यवंशी, दत्ता कलाले, मुरंबीचे सरपंच, उपसरपंच सुनिल चिंताले व ज्ञानोबा चावले, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष दयानंद सूर्यवंशी, युवा शहराध्यक्ष अमोल शेटे, चाकूर नगर पंचायत गटनेता हिरकनबाई लाटे, औद्योगिक वसाहत संचालक बाळू लाटे आदींचा समावेश आहे.