शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांची भेटीसाठी अजित पवारांकडे रीघ; चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 15:36 IST2025-02-14T15:36:25+5:302025-02-14T15:36:25+5:30
निवडून आलेल्या आमदारांपैकी अनेकजण आता सत्तेसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांची भेटीसाठी अजित पवारांकडे रीघ; चर्चांना उधाण
NCP Ajit Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी सलगी साधण्यास सुरुवात केली आहे की काय, या चर्चेनं जोर धरला आहे. कारण सोलापूर जिल्ह्यातून काही नेते उमेदवारीसाठी शरद पवार गटाकडे गेले आणि निवडूनही आले. आता सत्ता महायुतीची असल्याने शरद पवार गटातील आमदार आता अजितदादांकडे जात आहे.
माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी निवडणुकीत अजितदादांवर टीका केली होती. नुकतेच त्यांनी अजितदादांची भेट घेतली. त्यांच्यासोबत माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि उमेश पाटीलही होते. यापूर्वी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी आपण नावालाच शरद पवार गटाकडे असून आमचीच सत्ता आहे, असे जाहीरपणे बोलले होते. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांपैकी अनेकजण आता सत्तेसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी?
आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माकपची बैठक झाली. महाविकास आघाडीत राहायचे की नाही की स्वतंत्र निवडणुका लढवायच्या यावर बैठकीत चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून थोका मिळाल्याची तक्रार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मांडली. एक वेळ शरद पवार गटासोबत राहू. परंतु काँग्रेससोबत आघाडी नको, अशी भूमिका पदाधिका-यांनी मांडल्यामुळे माकपच्या वरिष्ठ नेत्यांची अडचण झाली. आघाडी कोणासोबत करायची आणि कोणासोबत नाही यासंदर्भात राज्यातील प्रमुख नेते निर्णय घेतील. आगामी प्रस्तावित निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.