नराधमाला जामीन मिळता कामा नये, कठोर शिक्षा द्या; कल्याण घटनेप्रकरणी गोऱ्हेंच्या पोलिसांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 21:09 IST2024-12-25T21:09:16+5:302024-12-25T21:09:54+5:30
आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक सर्व पुरावे सादर करावेत, अशा सूचना गोऱ्हे यांच्याकडून पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

नराधमाला जामीन मिळता कामा नये, कठोर शिक्षा द्या; कल्याण घटनेप्रकरणी गोऱ्हेंच्या पोलिसांना सूचना
Kalyan Crime: कल्याण पूर्व इथं एका १३ वर्षीय मुलीवर नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. अशातच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं असून गोऱ्हे यांनी एका पत्राद्वारे ठाणे पोलीस आयुक्तांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. आरोपींना जामीन मिळणार नाही व कठोर शिक्षा होईल यासाठी आवश्यक सर्व पुरावे सादर करावेत, अशा सूचना गोऱ्हे यांच्याकडून पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.
नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे की, "सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. सरकारच्या वतीने निष्णात वकिलांची नियुक्त करावी. तसंच पोलिसांनी सीसीटीव्हीसह इतर सर्व पुरावे तपासून घ्यावेत आणि लहान मुलींचे अपहरण, अत्याचार रोखण्यासाठी एसओपी तयार करण्यात यावा," अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
आरोपीला ठोकल्या बेड्या
नराधम विशाल गवळी याला पोलिसांनी शेगाव येथे आज बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात साथ देणारी त्याची पत्नी साक्षी हिलाही अटक केली आहे. आरोपीच्या घराबाहेर पडलेल्या रक्ताच्या डागांवरून त्याने मुलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशीरा मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी भिवंडी नजीकच्या बापगाव परिसरात एका लहान मुलीचा मृतदेह आढळला. चौकशीत तो कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या मुलीचाच असल्याचे समोर आले.
दरम्यान, मुलीच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका ठिकाणी मुलगी जाताना दिसली पण पुन्हा येताना दिसली नाही. त्याठिकाणी तपास केला असता एका घराच्या परिसरात रक्ताचे डाग पडलेले असल्याने तेथे राहणाऱ्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विशाल गवळीवर पोलिसांचा संशय बळावला. तो घरी आढळून आला नाही, पोलिसांनी त्याची पत्नी साक्षीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने विशालने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची कबुली दिली.