प्रदीर्घ उपचारानंतर मनोजकुमार जाणार हक्काच्या घरी!
By Admin | Updated: October 8, 2014 23:01 IST2014-10-08T22:17:57+5:302014-10-08T23:01:53+5:30
प्रादेशिक मनोरूग्णालयाने वर्षभरात २२ रूग्णांना परत मिळवून दिली हक्काच्या घराची ऊब

प्रदीर्घ उपचारानंतर मनोजकुमार जाणार हक्काच्या घरी!
मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -मानसिक आरोग्य बिघडलेला रूग्ण कोणालाच नको असतो. रूग्णालयात कितीही आपुलकी मिळाली तरी घराच्या चार भिंतींमधील मायेचा स्पर्श त्याला नेहमी बोलावत असतो. पण घर काही त्याला बोलावत नाही. याला अपवाद ठरणार आहे तो मनोजकुमार! मनोरुग्णालयातील २२वा रुग्ण म्हणून हा मनोजकुमार लवकरच त्याच्या हक्काच्या घरी या आजारातून बरा होऊन जाणार आहे. गेल्या वर्षभरात या मनोरूग्णालयाने २२ रूग्णांना त्यांच्या हक्काच्या घरी पाठविले आहे. उत्तरप्रदेशच्या मनोजकुमार यालादेखील त्यांचे हक्काचे घर लवकरच मिळणार आहे.
मानसिक स्थिती असंतुलित असणाऱ्या रूग्णांसाठी रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरूग्णालय १८८६ मध्ये स्थापन झाले. ब्रिटीशकालीन मनोरूग्णालयात कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रूग्णांवर उपचार केले जातात. ऐच्छिक व पोलिसांमार्फत या ठिकाणी रूग्ण दाखल केले जातात. अठरा वर्षापुढील रूग्णांना उपचार देताना त्यांच्याशी समुपदेशन साधून त्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न अधिक केला जातो. परराज्यातील रूग्णाचा पत्ता शोधण्यासाठी कार्यालयीन कामानंतर इंटरनेटवर शोध घेतला जातो. बहुधा आदिवासी समाजातील रूग्ण असतात, तेव्हा मात्र अडचण निर्माण होते. इंटरप्रिटरच्या सहाय्याने त्यांच्याशी संवाद साधला जातो.
काही रूग्ण बरे झाल्यानंतर घरी जातात. मात्र काहींना नातेवाईक स्वीकारतच नाही. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांना पोलीस पाटील, सरपंच यांच्यामार्फत समज देऊन ताब्यात देण्यात येतात. गेल्या वर्षभरात २२ मनोरूग्णांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्यामध्ये पंजाब, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र गुजरात, तमिळनाडू राज्यातील २००९ पासूनच्या मनोरूग्णांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. काही रूग्ण बरे होतात, मात्र त्यांचे नातेवाईक सापडत नाहीत. अशावेळी या व्यक्तींना मनोरूग्णालयातच ठेवून घेतले जाते.
विटा (सांगली) येथील अशोक हंबीराव जाधव यांचा मुलगा २००५ पासून प्रादेशिक मनोरूग्णालयात दाखल होता. सुरूवातीला त्याला नावही सांगता येत नव्हते मात्र उपचारानंतर त्याच्याशी बोलून त्यांच्या नातेवाईकाचा शोध घेण्यात आला. मानतेश कोळी या युवकाला कुडाळ पोलिसांनी मनोरूग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार करून नातेवाईकांचा शोध घेत त्याला घरी पाठविण्यात आले आहे.
आता त्यापुढील रुग्ण मनोजकुमार! मनोजकुमार हा रेल्वे पोलिसांकडून मनोरुग्णालयाकडे पाठविण्यात आला होता. उत्तरप्रदेश राज्यातील लखिनपूर-खैरी जवळील किसनगाव गावातील नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्याचे काका हयात असून अन्य कोणीही नाही. काकांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना रत्नागिरीत येणे शक्य नाही. त्यामुळे रत्नागिरीच्या मनोरूग्णालयातर्फे पोलिसांच्या मदतीने त्याला त्याच्या गावी पोहचविण्यात येणार आहे.
मनोरूग्णालयातील रूग्णावर निरीक्षण करण्यासाठी स्पेशल कमिटी व अभ्यागत समिती कार्यरत आहे. बरे झालेल्या रूग्णाबाबत कमिटी निर्णय घेते. संबंधित रूग्णांच्या नातेवाईकांचा शोध घेवून पोलिसांच्या मदतीने त्याला कुटूंबियांच्या स्वाधीन केले तर जाते परंतु तत्पूर्वी न्यायालयाच्या समोरही ठेवण्यात येते. मनोरूग्णांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी मनोरूग्णालयाचीधडपड सुरू आहे.
-डॉ. पराग पाथरे, वैद्यकिय अधिक्षक, प्रादेशिक मनोरूग्णालय, रत्नागिरी.