“धनंजय मुंडे पैसा, पदासाठी हपापलेला माणूस, सुरेश धस भेटायला नको होते”: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:49 IST2025-02-20T18:48:59+5:302025-02-20T18:49:30+5:30
Manoj Jarange Patil News: धनंजय मुंडेंकडून सत्तेतील खुर्ची सुटत नाही. पक्षाला दबाव असला तर सुरेश धसांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता. धस यांनी माझा आणि मराठा समाजाचा विश्वासघात केला, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

“धनंजय मुंडे पैसा, पदासाठी हपापलेला माणूस, सुरेश धस भेटायला नको होते”: मनोज जरांगे
Manoj Jarange Patil News: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. यातच या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली जात आहे. यामध्ये सुरेश धस, मनोज जरांगे पाटील, अंजली दमानिया आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर आता या प्रकरणात महाविकास आघाडीचे नेते पुन्हा सक्रिय झाले आहेत. यातच मराठा आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेले उपोषण स्थगित केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा बीड प्रकरणाकडे वळवला आहे.
मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या आठ मागण्यांपैकी चार मागण्या तात्काळ मंजूर केल्या होत्या. आता येणाऱ्या २५ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हैदराबाद, सातारा आणि मुंबई गॅझेट लागू करतील आणि त्यांची आम्ही भव्य असे स्वागत करू. मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा निर्णय २५ तारखेला शंभर टक्के जाहीर करतील, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे हा पैसा पद आणि राजकारणाला हपापलेला माणूस
धनंजय मुंडे यांना जनतेने मंत्री केले आहे. जनतेला वाटत असेल की, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता तर तो त्यांनी द्यायला हवा होता. धनंजय मुंडे हा पैसा, पद आणि राजकारणाला हपापलेला माणूस आहे. त्या पैशाच्या जीवावर राजकारण करतो. आतापर्यंत बऱ्याच जणांनी आपल्यावर आरोप झाल्यानंतर पदांचा राजीनामा दिला आहे पण हा माणूस एवढा हपापलेला आहे की, त्याला सत्तेतील खुर्ची सुटत नाही, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.
दरम्यान, आमदार सुरेश धस यांच्यावर मराठा समाजाने प्रचंड विश्वास टाकला होता. कधी नव्हे तो एका मराठा लोकप्रतिनिधीवर राज्यातला मराठा समाज प्रचंड प्रेम करीत होता. मी देखील सुरेश धस यांच्यावर प्रचंड विश्वास टाकला. पण सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची वार्ता कळल्यानंतर मात्र आमचा विश्वास त्यांच्यावरला उडून गेला आहे. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला नको होती. जरी त्यांच्यावर पक्षाने दबाव टाकला असला तरी सुरेश धस यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन मराठा समाजासमोर उभे राहिले असते तर मराठा समाजाने त्यांना डोक्यावर घेतले असते आणि पुन्हा एकदा त्यांना दोन लाख मताच्या फरकांनी विजयी केले असते. पण सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन मराठा समाजाचा तर विश्वासघात केलाच पण माझा त्यांच्यावरला विश्वास उडाला आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.