‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 18:53 IST2025-09-22T18:51:07+5:302025-09-22T18:53:33+5:30
Manoj Jarange Patil News: धनजंय मुंडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, मराठ्यांच्या नादाला लागू नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
Manoj Jarange Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या एका विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराड यांचे नाव आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर, काही काळ ते वैद्यकीय कारणास्तव सार्वजनिक कार्य्रकमापासून दूर होते. आता, ते पक्षाच्या कार्यक्रमात सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी खोचक शब्दांत भाष्य केले आहे.
माझी सुनील तटकरे यांना विनंती आहे की, त्यांनी कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावे. आम्ही चुकलो तर आमचे कान धरावे. चुकलो नाही तर चांगलेच आहे. पण आता रिकामे ठेवू नका. जबाबदाऱ्या द्या, असे धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात भर सभेत बोलताना म्हटले. यावर मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती.
रोजगार हमीच्या कामावर जा म्हणावे
पत्रकारांना प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, रोजगार हमीच्या कामावर जा म्हणावे, बाराशी खांदायला. तो माझा प्रश्न नाही, तो राजकीय आणि त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मराठ्यांच्या नादाला लागू नका. मराठ्यांना त्रास झाला तर अजित दादाचा कार्यक्रम झाला. इथे मराठ्यांना त्रास झाला तर अजित दादाचा खेळ संपला, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, तो तसेच लोक कामाला लावतो, मग त्याला खेळायला रान मोकळे राहते. तो फुकटात जातींचा उपयोग करून घेतो. तू गरीब जातींचा फुकटात उपयोग करून घेतो, त्याला भारी गेम जमतो, बोलून लोक कामाला लावायचे. ओबीसीला सर्वांत मोठा डाग असेल तर तो छगन भुजबळ आहे. सगळ्या ओबीसी आणि मराठ्यांचे त्याने वाटोळे केले, त्याला पापाची फेड करावी लागणार आहे. न्यायदेवता त्याच्यासाठी नाही, सर्वांसाठी आहे. तुझ्या डोक्यावर पापाचा हात आहे. पापाचा घडा भरला आहे तुझा. तुला अजून खूप भोगावे लागणार, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.