“लोकसभा नाही, विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात करणार, आरक्षण...”: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 13:09 IST2024-04-14T13:09:00+5:302024-04-14T13:09:35+5:30
Manoj Jarange Patil: सगळ्या पक्षांनी आणि जाती-धर्मांनी पाठिंबा दिला होता. यामुळे खासदार झाला असतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

“लोकसभा नाही, विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात करणार, आरक्षण...”: मनोज जरांगे
Manoj Jarange Patil: बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाने देशातील नागरिकांना न्याय दिला आहे. माझा राजकीय मार्ग नाही. लोकचळवळीचा मार्ग मला माहिती आहे. मी कुठल्याच पक्षाचा नाही. लोकसभेत आम्ही उतरलो नाही, परंतु विधानसभेची तयारी जोरात करणार आहोत, असे मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मराठा बांधव कोणाच्या सभांना जात नाही. ते फक्त मजा बघत आहेत. ते उमेदवारांना पाडणार आहेत. तो आमचा मोठा विजय होणार आहे. आम्हाला वेळ कमी होता. लोकसभा निवडणूक खूप मोठी असते. त्याचे कार्यक्षेत्र मोठे असते, असे सांगत जून महिन्यापर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर ६ जूनपासून पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला.
बहुमताशिवाय राजकारणाला किंमत नाही, राजकारण आपले क्षेत्र नाही
बहुमताशिवाय राजकारणाला किंमत नाही. भावनेच्या जीवावर राजकारणात मत घेता येत नाही. मी निवडणूक लढणार नाही. मला मराठा बांधव महत्त्वाचा आहे. सगळ्या पक्षांनी आणि जाती-धर्मांनी पाठिंबा दिला होता. यामुळे खासदार झाला असतो. परंतु राजकारण हे आपले क्षेत्र नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान, महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले. आज देऊ, उद्या देऊ असे करून सात महिने झाले. मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांना अतिप्रेम आहे. इतके प्रेम उफाळून येते की, त्यांचे काही सांगता येत नाही. मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सात महिन्यांआधीचे गुन्हे काढले जात आहेत. गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बढती दिली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखी कामगिरी आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.