Manoj Jarange Patil: बीड कारागृहात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला मारहाण झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून करण्यात आला. परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात वाल्मीक कराडने आम्हाला विनाकारण गुंतवून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा बबन गित्ते आणि महादेव गित्ते यांचा दावा आहे. याच रागातून महादेव गित्ते याने आता तुरुंगात वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचे मला कळाले, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. तुरुंग प्रशासनाने सदर दावे फेटाळले असले तरी यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
सकाळच्या सुमारास महादेव गित्ते आणि सोनावणे-फड टोळीत फोन करण्यावरून वाद झाला. नंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. गित्ते आणि या टोळीत वाद झाला असला तरी या घटनेशी वाल्मीक कराड याचा काहीही संबंध नाही. सदर घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही किंवा कोणालाही इजा नाही, अशी माहिती बीड कारागृहाचे पोलीस महासंचालक जालिंदर सुपेकर यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी यावर भाष्य केले.
आरोपी सोंग करणारे आहेत, ताबडतोब फाशीची शिक्षा झाली पाहिजे
काय झाले याबाबत काही माहिती नाही. नेमके काय घडले हे प्रशासनाला माहिती असेल. हे आरोपी सोंग करणारे आहेत. लोकांना वेड्यात काढण्याचा प्रकार करतात. कुठे दुखते म्हणतील, अॅडमिट होतील, नाही तर दुसऱ्या जेलला जाऊ द्या, असे सांगतील. मारामाऱ्या नाही झाल्या तरी त्या झाल्या असे म्हणतील. याबाबत अधिकृत माहिती बाहेर येईपर्यंत आपल्याला त्यावर काही बोलता येणार नाही. पण हे सोंग असू शकते, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
दरम्यान, आता त्यांचे काय करावे हे तुरुंग प्रशासन ठरवेल. परंतु, संतोष देशमुख प्रकरणाचा खटला लवकरात लवकर संपवणे गरजेचे आहे. हे लोक एकमेकांना संपवतील, त्यापेक्षा हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून यांना ताबडतोब फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच या लोकांना सहकार्य करणाऱ्यांना पकडले पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.