मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज अखेर पाच दिवसांपासून सुरु असलेले उपोषण सोडले आहे. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्याकडून सरबत घेतले. तसेच जर काही बदल असेल किंवा काही अडचण आली तर आपण विखेंच्या घरात बसून राहणार असेही जरांगेंनी सांगितले.
मराठा आरक्षणाचा जीआर निघाला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू केले जाणार आहे. जीआर निघाल्यानंतर दोन दिवसांत त्याचे आदेश जिल्हा स्तरांवर पाठविले जाणार आहेत. यानंतर ज्यांची मागणी असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी इथे यावे अशी मागणी जरांगेंनी केली होती, परंतू नंतर विखे पाटलांनीच सारे केले. यामुळे त्यांच्या हस्तेच उपोषण सोडणार असल्याचे जरांगे म्हणाले. ते तिघे आले असते तर नाराजी थोडी कमी झाली असती. परंतू ते तिघे आले नाहीत तर ती तशीच राहणार, मी फोनवर वगैरे बोलणार नाही, असे जरांगेंनी स्पष्ट केले.
जरांगे यांनी मंत्र्यांसमोर जर या जीआरमध्ये काही दगाफटका झाला तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे. तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो. मागण्या मान्य झाल्या की, सगळे मराठे आनंद व्यक्त करत मुंबईच्या बाहेर पडतील. सरकारने एकूण ३ जीआर काढावेत. सातारा, हैदराबाद गॅझेटियरचा वेगवेगळा जीआर आणि आमच्या इतर मागण्यांचा वेगळा जीआर काढावा, अशी अट जरांगे यांनी विखे पाटलांसमोर ठेवली होती.