मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 09:59 IST2025-05-02T09:57:32+5:302025-05-02T09:59:30+5:30

Manoj Jarange Patil News: २९ ऑगस्ट रोजी मुंबईत जाऊन आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

manoj jarange patil health deteriorates beed tour abandoned admitted to hospital for treatment | मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एका कंबर कसली आहे. मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन करण्याचा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. केवळ मराठा आरक्षण नाही, तर बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरणही मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरले आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाली आहे. 

मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, २८ ऑगस्टपर्यंत त्यांच्या ८ ते ९ प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास ते २९ ऑगस्ट रोजी मुंबईत जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आहेत. यासोबतच, अंतरवाली सराटीत चालू असलेले उपोषणही कायम राहणार आहे. यातच मनोज जरांगे पाटील बीड दौऱ्यावर होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी दौरा अर्धवट सोडण्याचे म्हटले जात आहे. 

बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांची अचानक तब्येत खालावली आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजी नगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, मी मुंबईला जाताना विजयाचा आणि अंत्ययात्रेचा असे दोन रथ घेऊन जाणार आहे. हे केवळ आंदोलन नाही, तर मराठा समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत, असा अध्यादेश तातडीने काढावा. ५८ लाख नोंदींचे पुरावे देऊनही आरक्षणाचा कायदा केला गेलेला नाही. मागील दोन वर्षांपासून संयम पाळला जात आहे. अनेक मागण्या प्रलंबित असून संबंधित अधिकाऱ्यांचा जातीय दृष्टिकोन आड येत आहे. २८ ऑगस्टनंतर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर माझ्या मराठा बांधवांसोबत मुंबईत उतरणार आणि तेथे आमरण उपोषण करणार आहे. आंदोलन शांततेतच होईल. कुणालाही धक्का लागू नये, ही माझी अपेक्षा आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

 

Web Title: manoj jarange patil health deteriorates beed tour abandoned admitted to hospital for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.