Manoj Jarange Patil Dasara Melava 2025: विजयादशमी दसरा संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्रात दसऱ्याच्या निमित्ताने राजकीय आखाडाही रंगतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंकजा मुंडे, मनोज जरांगे पाटील यांचे दसरा मेळावे जोरदार झाले. यासह ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचाही दसरा मेळावा आहे. रुग्णालयात उपचार सुरू असूनही दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थिती लावली. बीडमधील नारायण गडावर दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुढील आंदोलनाचा इशारा दिला.
छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, आणि धर्मवीर संभाजीराजे यांना वंदन करून मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. याच दरम्यान “मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे...”, असे म्हणत भावनिक साद घातली. खूप वेदना आहेत, शरीराला त्रास होत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवत असली तर बघा. एक पाच, सहा महिन्यांपूर्वी एक गोष्टी सांगितली होती. शेवटी शरीर आहे. काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराच्या आयुष्याचे कल्याण करू द्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
सरकारने मदत दिली नाही तर आंदोलन करणार
मी सरकारला जाहीरपणाने सांगत आहे की, मराठवाडा आणि लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याशिवाय माघार नाही. हे काम दिवाळीच्या आत करायचे आहे. सरकारने दिवाळीच्या आत ओला दुष्काळ जाहीर करायचा आहे. सरकारने कॅश द्यावी. आता शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली आहे. ज्यांचे शेत वाहून गेले नाही, त्यांना सरसकट ७० हजार रुपये हेक्टरी मदत करा. ज्यांच्या नदीच्या शेजारचे वावर वाहून गेलेत, पीक वाहून गेले त्यांना १ लाख ३० हजार रुपये भरपाई म्हणून द्यावी. ज्यांचे जनावरे वाहून गेले, कांदा वाहून गेला, सोयाबीन वाहून गेले, धान्य वाहून गेले त्या लोकांचे शेतकरी सांगेल तसा पंचनामा करून शंभर टक्के भरपाई द्यावी. सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी द्यावी. सरकारने मदत दिली नाही तर आंदोलन करणार, सरकारला एक महिन्याची मुदत देत आहोत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, शेतकऱ्याचे ऊसाचे पंधरा रुपये कापायचे ठरवले आहे. अजिबात एक रुपया कापायचा नाही. याला पर्याय म्हणून ज्या सरकारी कर्मचाऱ्याला दहा हजार रुपये पगार आहे. त्याचे अडीच हजार रुपये कापा. ज्याला वीस हजार रुपये पगार आहे त्याचे पाच हजार रुपये कापा. ज्याला १ लाख पगार आहे त्याचे २५ हजार रुपये कापा. ज्याला २ लाख रुपये पगार आहे त्याचे ५० हजार रुपये कापा. चार-पाच लाख अधिकाऱ्यांचे पैसे कापले तर जवळपास हजार कोटी रुपये जमा होतील. फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.