विधिमंडळात ऑनलाइन रमी खेळणाने राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर पत्ते फेकल्याने लातूरमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांच्यासह इतरांना मारहाण केली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यात आले. तसेच हे निवेदन देत असताना त्यांच्यावर छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले. त्यामुळे बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.
यावेळी अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांच्यासह इतरांना मारहाण केली. सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संवाद मेळाव्यासाठी लातूर येथे आले होते. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही घटना घडली.
दरम्यान, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादा तुमच्या कार्यकर्त्यांनी आज आमच्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. आमच्या निवेदनाला तुम्ही लाथा बुक्क्यांनी प्रतिसाद देणार असाल तर याचा हिशोब होईल, त्याची राजकीय किंमत तुम्हाला चुकवावी लागेल, असा इशारा घाटगे यांनी अजित पवार गटाला दिला आहे.