Sanjay Raut on Manikrao Kokate: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन केलेल्या विधानावरुन शेतकऱ्यांसह विरोधक संतापलेले आहेत. अशातच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कर्जमाफीवर बोलताना कृषीमंत्री कोकाटे यांनी केलेल्या विधानाने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. कर्जमाफीच्या पैशांनी काय करता असा सवाल करत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं. त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी कृषीमंत्री कोकाटेंवर टीकेची झोड उठवली आहे. माणिकराव कोकाटे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.
नाशिक येथे अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीबद्दल विचारणा केली. त्यानंतर कृषीमंत्री कोकाटे यांनी कर्जातून मिळणाऱ्या पैशांबाबत शेतकऱ्यांनाच उलट सवाल केला. शेतकरी एक रुपयाची तरी गुंतवणूक करतो का असं माणिकराव कोकाटे म्हणाले. त्यावरुन विरोधकांनी त्यांना घेरलं आहे. संजय राऊत यांच्यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही कृषीमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केले तर बरं होईल असं रोहित पवार म्हणाले.
"माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झाले आहेत. माणिकराव कोकाटे हे राजकारणात अनेक वर्ष आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना दुखावणारे अशा प्रकारचे वक्तव्य करू नयेत. अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या लोकांना लगाम घातला नाही तर यांचे काही खरे नाही. तिघांची भाषणं ऐकली तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केले आहेत असं वाटतं. स्वतः अजित पवार हे कॉमेडी शो करत आहे. प्रफुल पटेल यांचा देखील कॉमेडी शो सुरू आहे. राज्याचे कृषीमंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करत आहेत. खिल्ली उडवत आहेत," अशी टीका संजय राऊत यांनी केली.
"कोकाटे साहेब, कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांना मिळत नाही हे कदाचित आपल्याला ज्ञात नसावे. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही. मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना ब्रम्हज्ञान देण्याची गरजंच नाही. रोज कोट बदलणाऱ्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याचा फाटलेला सदरा दिसत नसला तरी आपल्या वादग्रस्त संवेदनांचं प्रदर्शन करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं तर अधिक बरं होईल," असं रोहित पवार म्हणाले.