“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 11:41 IST2025-07-22T11:40:19+5:302025-07-22T11:41:14+5:30
Manikrao Kokate PC News: हा इतका छोटा विषय आहे. हा विषय एवढा का लांबला हे मलाही समजले नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी माणिकराव कोकाटे यांनी केली आहे.

“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
Manikrao Kokate PC News: रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याबाबत मला विचारणा केली जाणार हे माहिती होते. खरे म्हणजे हा इतका छोटा विषय आहे. हा विषय एवढा का लांबला हे मलाही समजले नाही. यासंदर्भात मी आधीच खुलासा केला आहे. मी ऑनलाइन रमी खेळत असेन, मी जर दोषी सापडलो, तर नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांपैकी कुणीही निवेदन करावे. त्या क्षणाला न थांबता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना न भेटता राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन, असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना उत्तर दिले.
नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषद सभागृहात कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाइलवर रमी हा पत्त्यांचा ऑनलाइन गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावर पत्रकारांनी माणिकराव कोकाटे यांना प्रश्न विचारला. ऑनलाइन रमी काय प्रकार आहे, हे आपल्याला माहिती आहे का? ऑनलाइन रमी खेळत असताना त्याला मोबाइल नंबर आणि बँक अकाऊंट संलग्न करावे लागते. त्याशिवाय तुम्हाला ऑनलाइन रमी खेळता येत नाही. माझा मोबाइल नंबर आणि अकाऊंट नंबर मी देणार आहे. ज्या दिवसापासून ऑनलाइन रमी सुरू झाली, तेव्हापासून आजतागायत एक रुपायाची रमी मी खेळलेलो नाही. मला रमी खेळताच येत नाही. अशा प्रकारचा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात माझी बदनामी झाली आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे. ज्यांनी माझी बदनामी केली, त्या सर्वांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही.
...तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन
रमी नाहीच. त्या दिवशी सभागृहात सहा वाजता माझी लक्षवेधी होती. माझ्या ओसडीकडून माहिती मागवायची असेल, तर एसएमएस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो. त्याशिवाय त्यांना येता येत नाही. त्यासाठी मी मोबाइल मागवला होता. मी मोबाइल उघडल्यावर लगेच त्यावर तो गेम आला. एक-एक सेकंदाला गेम पॉप-अप होतो. तो गेम स्कीप करता आला नाही. कारण, मोबाइल माझ्या दृष्टीकोनातून नवीन होता. गेम स्कीप केलेल्याचा मुद्दा समोर आलाच नाही. तो एकच गेम येत नाही. आपण ५जी वापरतो. मोबाइलमध्ये गेम येत राहतात ते स्कीप करावे लागतात. हा १८ सेकंदाचा व्हिडिओ आहे. मोबाइल उघडल्यावर तो गेम आला, गेम स्कीप केल्याचा व्हिडिओ आला नाही, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. पूर्ण खेळ त्यांनी का दाखवला नाही. पूर्ण खेळ दाखवला असता, तर सगळ्यांच्या लक्षात आले असते की, यामध्ये काही तथ्य नाही. मी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती, विधानसभा अध्यक्ष या चौघांना लेखी पत्र देणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. माझ्या पत्राच्या आधारे चौकशी करावी. जर मी ऑनलाइन रमी खेळत असेन, मी जर दोषी सापडलो, तर नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांपैकी कुणीही निवेदन करावे. त्या क्षणाला न थांबता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना न भेटता राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन, असे माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न असताना कृषिमंत्र्यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो दिवसभर प्रचंड व्हायरल झाला. विरोधकांनी यावरून माणिकराव कोकाटे यांच्यावर सडकून टीका केली. तसेच कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.