कणकवली : निसर्गाच्या लहरीपणामुळे ८५ टक्के नुकसान सोसणाऱ्या सिंधुदुर्गातील आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार सरसावले आहे. बारामती येथील ‘एडीटी’ संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन प्रणालीचा वापर करून आंबा शेतीचे डिजिटल व्यवस्थापन केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी येथे केली. यासाठी जिल्हा नियोजनातून ४.५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
कणकवली येथील पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, जिल्ह्यातील ३४,२९६ हेक्टर आंबा क्षेत्राला हवामान बदल आणि कीडरोगाचा विळखा बसला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता प्रत्येक झाडाचे निरीक्षण करणारी आणि दर ५०० मीटरवर अचूक हवामानाचा अंदाज देणारी विशेष यंत्रणा विकसित केली जाणार आहे. प्रति हेक्टर ४५ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाचा अहवाल १० दिवसांत सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
संशोधन केंद्राला सज्जड दम
यावेळी पालकमंत्र्यांनी आंबा संशोधन केंद्राच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. “सरकार पगार देते, पण शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळत नाही. हा ढिसाळ कारभार खपवून घेतला जाणार नाही,” असा सज्जड दम त्यांनी दिला. पंचनामे झाले नसतील तर बागायतदारांनी तत्काळ माहिती द्यावी, शासन तुमच्या पाठीशी ठाम उभे आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
‘राजकारण नको, शेतकरी हित पहा’
१२ मार्च रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चाबाबत बोलताना ते म्हणाले की, “आंदोलन करणे हा अधिकार आहे, पण सध्या संकट जिल्ह्यावर आहे. आखाती देशांतील बाजारपेठ टिकवण्यासाठी आपल्याला ‘सिंधुदुर्ग’ म्हणून एकत्र लढावे लागेल. संवादातून मार्ग काढूया, माझे दरवाजे शेतकऱ्यांसाठी नेहमी उघडे आहेत.”
तंत्रज्ञानाची ‘कवचकुंडले’
एआय आणि ड्रोन : प्रत्येक झाडाची प्रकृती आणि कीडरोगावर चोवीस तास लक्ष ठेवणार.अचूक हवामान : दर ५०० मीटरवर हवामानाचा अंदाज देणारी यंत्रणा कार्यान्वित होणार.डिजिटल व्यवस्थापन : लागवडीपासून काढणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर बागायतदारांना मोबाइलवर मार्गदर्शन मिळणार.
Web Summary : Maharashtra approves funds for AI-powered mango farming in Sindhudurg, addressing climate change and pest issues. Drones and digital management will aid farmers, with weather forecasts every 500 meters. Minister warns research center for poor support.
Web Summary : महाराष्ट्र ने जलवायु परिवर्तन और कीट समस्याओं से निपटने के लिए सिंधुदुर्ग में एआई-संचालित आम की खेती के लिए धन स्वीकृत किया। ड्रोन और डिजिटल प्रबंधन किसानों की मदद करेंगे, हर 500 मीटर पर मौसम का पूर्वानुमान होगा। मंत्री ने खराब समर्थन के लिए अनुसंधान केंद्र को चेतावनी दी।