‘माणूसपण’ हरवतंय तिलारी वसाहतीतील स्थिती : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By Admin | Updated: October 26, 2014 23:24 IST2014-10-26T22:06:33+5:302014-10-26T23:24:09+5:30
वसाहती भकास करुन त्यानंतर पाडून टाकण्यापेक्षा आम्हाला राहण्याकरिता द्याव्यात,

‘माणूसपण’ हरवतंय तिलारी वसाहतीतील स्थिती : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
वैभव साळकर - दोडामार्ग कधीकाळी दोडामार्ग तालुक्याची ‘शान’ असलेल्या तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या वसाहती आता ओस पडल्याने आणि त्या लाखमोलाच्या वसाहतींकडे तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्णपणे दुर्लक्ष केल्याने वसाहती आता अखेरच्या घटका मोजत आहेत. काहीजण कॉलनीत राहत असल्याने थोड्या प्रमाणात या ठिकाणी वस्ती दिसत होती. पण आता पाटबंधारे विभागाकडून खासगी भाडेतत्वावरील रहिवाशांना 30 आॅक्टोबरपर्यंत खोल्या खाली करण्याबाबत पत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे वसाहतींचे उरले सुरलेले माणूसपणही विलग होणार असून या वसाहती आता भकास होण्याच्या मार्गावर आहेत. सुमारे तीस वर्षांपूर्वी म्हणजे १९८० च्या दरम्यान ‘तिलारी’ या कोकणातील आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या उभारणीस सुरवात झाली. गोवा व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या या पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास त्याचदरम्यान गती मिळाली. परिणामी राज्यातील जलसंपदा व पाटबंधारे विभागात कार्यरत असणारे शेकडो अधिकारी व हजारो कर्मचारी तिलारी येथे दाखल झाले. दीर्घकाळ चालणाऱ्या या प्रकल्पामुळे त्या कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी त्यांना कुटुंबीयांसमवेत राहता यावे, यासाठी पाटबंधारे खात्याने सर्वप्रथम तिलारीत तीन वसाहतींचे बांधकाम केले. त्यात स्वतंत्र इमारती, शेकडो खोल्यांच्या चाळी उभ्या केल्या. त्यात तिलारी येथे मिनीकॉलनी (लघु वसाहत), कोनाळकट्टा येथे मेनकॉलनी (मुख्य वसाहत) व पुढे मेकॅनिकल कॉलनी (मोठी वसाहत) अशा तीन ठिकाणी या वसाहती स्थापन करून त्यात शेकडो निवासी संकुले उभी केली. त्यापैकी मुख्य वसाहत येथे पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आणि सर्वच कार्यालये स्थापन झाल्याने या वसाहतीत अधिकारी व उच्च श्रेणीतील कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र इमारत बंगलो व चांगल्या दर्जाची वसाहत उभारण्यात आली. त्या खालोखाल अन्य दोन्ही वसाहतीची बांधणी झाली. दर्जानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यातील निवासी संकु ले व चाळीतील खोल्याचे वितरण करण्यात आले. त्यानंतर आता २0१४ पर्यंत तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे काम वेगाने चालले. त्याचदरम्यान तिलारीचे मुख्य धरणही पुर्णत्त्वास आले. परिणामी शेकडो हजारो कर्मचारी व त्यांच्या फॅमिलीने गजबजलेल्या वसाहती ओस पडू लागल्या. धरण आणि प्रकल्प पूर्णत्त्वास येऊ लागल्याने याठिकाणी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या अन्य प्रकल्पाच्या ठिकाणी करण्यात आल्या. दोडामार्गातील सोयीसुविधा तिलारीतील या वसाहतीतील सोयीसुविधांशी त्यावेळी स्पर्धा करायच्या असे म्हटल्यासही ते वावगे ठरू नये. त्यामुळे तिलारी म्हणजे दोडामार्गची शान अशीच ओळख सर्वश्रृत होती. मात्र, तिलारी प्रकल्प पूर्णत्त्वास आल्यावर त्यात प्रचंड फरक पडला आहे. ‘तिलारी ’ ची ती ‘शान’ उलट मार्गाने पुसली जाऊ लागली. अधिकारी, कर्मचारी आणि माणसाच्या वास्तव्याने या वसाहती ओस पडल्या. आणि गेल्या पाच वर्षांत याच लाखमोलाच्या वसाहतींची पार वाट लागली. कधीकाळी माणसांनी गजबजलेल्या या वसाहतींमध्ये मध्यंतरीच्या काळात प्रकल्प पूर्णत्त्वास आल्यावर माणसे शोधण्याची वेळ आली होती. मात्र, अलिकडेच गेल्या दोन- चार वर्षांत त्यात काहीसा फरक पडला आहे. दोडामार्ग तालुक्याच्या निर्मितीमुळे अनेक शासकीय कार्यालये दोडामार्गात कार्यरत झाली. शाळांची संख्या वाढली. परिणामी शासकीय अधिकारी आणि कर्मचारीही निवासासाठी दोडामार्गात आले. त्याच कर्मचाऱ्यांना तिलारीच्या या वसाहती आधारवड ठरू लागल्या. सध्या या वसाहतीत ग्रामसेवक, शिक्षक व येथील कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांचे वास्तव्य आहे. मात्र, ते अगदीच अल्प आहे. मुख्य वसाहत व मिनी वसाहत या दोन्ही वसाहती वेगळ्यात तर तिसरी कोनाळकट्टा येथील मेकॅनिकल वसाहत पूर्णत: ओस पडली आहे. तेथील चाळींची पुरती वाताहत सुरू झाली आहे. आणि या दोन वसाहतीतही जिथे कोणाचे वास्तव्य नाही अशा इमारतींचीही पडझड सुरू झाली आहे. पर्यटनावरही होणार परिणाम तिलारी धरणामुळे पर्यटनदृष्ट्या तिलारीची ओळख सर्वदूर झाली. या ठिकाणी असणारे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होतात. या ठिकाणी असणाऱ्या दोन बागांचा ठेकाही बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा परिसर देखभालीशिवाय भकास होणार असल्याने याचा परिणाम येथील पर्यटनावर होणार आहे. खर्च परवडत नसल्याने निर्णय - कुरणे कॉलनीत खासगी क्षेत्रात काम करणारे काही अधिकारी व कर्मचारी रहायला आल्याने थोड्या प्रमाणात गर्दी दिसत होती. पण आता अधिकाऱ्यांनी खोल्या खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. याबाबत तिलारी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. बी. कुरणे यांना विचारले असता, सर्वात पहिल्यांदा मेकॅनिकल कॉलनी खाली करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. या ठिकाणी राहणारी कुटुंबे व त्यांना वीज, पाणी पुरवठा करण्यासाठी होणारा खर्च यांचा ताळमेळ बसत नाही. यात विभाग तोट्यात जात आहे. पाटबंधारे विभागाकडे खर्च करण्यासाठी रक्कमच नाही. मुख्य कॉलनीत अधिकारी वर्ग राहत आहे. शिवाय कार्यालये असल्यामुळे आता एकच कॉलनी राहणार असल्याचे स्पष्ट केले. वसाहतीतील रहिवाशांची मागणी सध्या मेकॅनिकल कॉलनीतील सुमारे ७0 कुटुंंबांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे. त्या रहिवाशांनी सांगितले की, जर संबंधित विभागाला वसाहतीचा खर्च करणे कठीण जात असेल तर त्याप्रमाणात कर द्यायला आम्ही तयार आहोत. वसाहती भकास करुन त्यानंतर पाडून टाकण्यापेक्षा आम्हाला राहण्याकरिता द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.